गणवेशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 10:54 PM2022-11-04T22:54:58+5:302022-11-04T22:56:22+5:30
Nagpur News प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.
नागपूर : प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच हे आंदोलन करण्यात आले. पैसे घेऊनदेखील गणवेश न दिल्याचा आरोप यावेळी जवानांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर सर्वांनी आंदोलन मागे घेतले.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलासाठी तरुणांची निवड केली जाते. त्यांना राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण करणे अनिवार्य असते. नागपुरात ४५ दिवसांचे प्रशिक्षण होते. प्रशिक्षण कालावधीत गणवेशासाठी जवानांकडून अडीच हजार रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी काही जणांना गणवेश देण्यात आला. मात्र, इतरांना प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश मिळाला नाही. यामुळे जवानांमध्ये संताप होता. अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर प्रशिक्षण संपल्यावरदेखील गणवेश न मिळाल्याने प्रवेशद्वारासमोरच काही जवानांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली.
जवानांकडून निदर्शने सुरू झाल्यानंतर ‘आरपीटीएस’च्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यांचे काम केवळ प्रशिक्षण देण्याचे होते. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नसल्याची त्यांनी भूमिका घेतली. अखेर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांची समजूत काढली. कामावर रुजू होण्याअगोदर गणवेश देण्यात येईल, असे त्यांना आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जवानांनी आंदोलन मागे घेतले. अनेक जवान हे गरीब तसेच शेतकरी कुटुंबांतील आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ही गरीब कुटुंबांतील तरुणांची फसवणूक आहे, असा आरोप या जवानांनी केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक किशोर पाडवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दहा हजार अगोदरच केले जमा
नियमानुसार प्रशिक्षणार्थींना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १० हजार रुपये जमा करावे लागतात. यातील पाच हजार रुपये प्रशिक्षणानंतर परत मिळतात. याशिवाय प्रशिक्षण कालावधीतील पीटी साहित्यदेखील उमेदवारांना स्वत:च खरेदी करावे लागते. इतके पैसे खर्च केल्यावर गणवेशासाठी वेगळे पैसे घेतल्यावरदेखील ते न दिल्याने उमेदवारांना आर्थिक भुर्दंड पडला आहे.