RTMNU नागपूर विद्यापीठाची ‘सिनेट’ बैठक सुरू होताच विसर्जित; सदस्यांचे कक्षात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 11:14 AM2022-03-21T11:14:27+5:302022-03-21T11:57:38+5:30
Nagpur University विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना बगल दिल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची बैठक वादग्रस्त ठरली आहे. सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले. यामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला असून कुलगुरू निघून गेल्याने सदस्यांनी कुलसचिवांना घेराव घातल्याची माहिती आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता सिनेट बैठकीला सुरुवात झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली व विद्यापीठाच्या विविध धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना बगल दिल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. यावरून विद्यापाठातील वातावरण तापले असून कुलगुरू निघून गेल्याने सिनेट सदस्यांनी कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांना घेराव घालत आक्षेप नोंदवला.
सिनेट बैठक सुरू होताच समाप्त झाली. एकही मुद्दा उपस्थित न होता सिनेटची बैठक विसर्जित करण्याचा प्रकार १०० वर्षात पहिल्यांदाच विद्यापीठात घडला असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्राद्वारे पुन्हा मिटींग घेण्याबाबत निवदेन करणार असल्याचा निर्णय सिनेट सदस्यांनी घेतला असल्याचे कळते.
दरम्यान, नुकताच विद्यापीठाच्या ‘संशोधन सल्लागार समिती’समोर (आरएसी) लघुशोधप्रबंध सादर करणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आला असल्याची तक्रार करण्यात आली होती. विषेश म्हणजे ‘आरएसी’मधील एका सदस्याने या विद्यार्थिनींना प्रबंध मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. सिनेटच्या सभेतदेखील हा मुद्दा उपस्थित झाला होता व लैंगिक छळ झाल्याचा आरोप काही सदस्यांकडून करण्यात आला. मात्र, विद्यार्थी कल्याण संचालकांकडे झालेल्या तक्रारीत लैंगिक छळाचा मुद्दाच नाही. अशा स्थितीत नेमकी स्थिती तपासण्यासाठी कुलगुरूंनी चौकशी समिती स्थापन केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यापीठ शिक्षण मंचने केली होती. तर, आज सिनेट बैठक सुरू होताच स्थगित झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.