मेट्रो हाऊससमोर मृतदेह ठेवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:35 PM2018-08-14T23:35:30+5:302018-08-14T23:42:14+5:30
अंबाझरी मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तिन्ही विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊससमोर अॅम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार, उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, राजेश कुंभलकर, विजय शिंदे आदी नेते आणि मृताच्या कुटुंबीयांनी धरणे दिली आणि तीव्र निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तिन्ही विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊससमोर अॅम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार, उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, राजेश कुंभलकर, विजय शिंदे आदी नेते आणि मृताच्या कुटुंबीयांनी धरणे दिली आणि तीव्र निदर्शने केली.
महामेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. अंबाझरी मार्गावर दवाखाने, शाळा, कॉलेज आहेत. तसेच या मार्गावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्राने रस्त्याच्या कडेला पडलेले बांधकाम साहित्य तात्काळ उचलावे. मेट्रोने वर्दळीच्या ठिकाणचे बांधकाम रात्री १० नंतर करावे. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रु. आणि एका सदस्याला मेट्रोमध्ये नोकरी द्यावी आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नोकरी न दिल्यास नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा त्यांनी दिला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करून अधिकाधिक आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलकांनी नमते घेतले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही घटना दु:खद आहे. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करून अधिकाधिक आर्थिक मदत करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. आर्थिक मदत आणि तिन्ही विद्यार्थिनीच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला मेट्रोमध्ये नोकरी देण्यासंदर्भात बुधवार, १५ आॅगस्टला बैठक होणार आहे. महामेट्रो १० लाख रुपये देणार आहे. विमा पॅकेज, वेलफेअर पॅकेजसह कंत्राटदारांकडून आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेच्या चौकशीनंतर पोलीस जे निर्णय घेतील, त्यानुसार कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल.