कृषी विभागातील भरती प्रक्रियेचा घोळ पेटला !
By Admin | Published: October 2, 2015 07:45 AM2015-10-02T07:45:48+5:302015-10-02T07:45:48+5:30
कृषी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा घोळ आता चांगलाच पेटला आहे. चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेने
नागपूर : कृषी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा घोळ आता चांगलाच पेटला आहे. चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेने भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना अक्षरश: वेठीस धरले आहे. कृषी विभाग व संबंधित संस्था सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवड प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे कृषी विभागातील कंत्राटी तरुण कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे या संपूर्ण निवड प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवून, ही निवड प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
‘सर्च’ या संस्थेने नागपूर विभागात २८२ पदे रिक्त नसताना, ती सर्व पदे भरण्याची बोगस जाहिरात प्रकाशित करू न हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केली आहे. एवढेच नव्हे, मुलाखतीच्या नावाखाली हजारो तरुणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. असे असताना कृषी विभाग संबंधित संस्थेला रोखण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी अजूनपर्यंत या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही. उलट कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे विभागातील सर्व ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांना एक पत्र जारी करू न त्यांना आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संबंधित संस्थेकडून भरती करू न द्यावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबंधित संस्थेने मागील २ ते ५ सप्टेंबर दरम्यान मुलाखती घेऊनसुद्धा अजूनपर्यंत उमेद्वारांची अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही. असे असताना संबंधित संस्था ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांकडे उमेदवार कसे पाठवू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अजूनपर्यंत संबंधित संस्थेने किती उमेद्वारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यापैकी किती उमेद्वारांची अंतिम निवड झाली, याविषयी कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही संपूर्ण निवड प्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात अडकली असून, त्याला कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)
एका दिवसाच्या सुटीवरू न सेवा समाप्ती
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश झुगारू न चंद्रपूर येथील ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांनी त्यांच्याकडील सहा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बीटीएम) व एका सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाला (एटीएम) नोकरीतून तडकाफडकी काढल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी होले नावाच्या एका कर्मचाऱ्याला केवळ तो एक दिवस न सांगता सुटीवर गेल्याच्या कारणावरू न त्याची सेवा समाप्त करण्यात आली आहे. यासंबंधी चंद्रपूर येथील ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांनी जारी केलेल्या आदेशाची प्रत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला मिळाली आहे. शिवाय ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमक्ष एक अर्ज सादर करू न, न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रहांगडाले यांनी दिली. दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांना आपली घोडचूक लक्षात घेताच त्यांनी सावरासावर सुरू केली आहे. त्यामुळे त्यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थेच्या माध्यमातून पुन्हा नोकरीवर घेण्याचा खटाटोप केला जात आहे.
कृषी विभागाची बनवाबनवी
मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या घोळासंबंधी ‘लोकमत’ प्रतिनिधीने दोन दिवसांपूर्वी कृषी सहसंचालक विजय घावटे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी याप्रकरणी अजूनपर्यंत आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय तशी तक्रार आल्यास चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र, ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद रहांगडाले यांच्या मते, मागील ३१ आॅगस्ट रोजीच कृषी सहसंचालक घावटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लेखी तक्रार देण्यात आली आहे. शिवाय ‘सर्च’ संस्थेच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला असल्याचे रहांगडाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घावटे यांना दिलेल्या तक्रारीची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. यावरू न कृषी विभागाच्या बनवाबनवीचा भंडाफोड झाला असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, कृषी सहसंचालक विजय घावटे यांची कृषी विभागातील एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र असे असताना या प्रकरणात ते संबंधित संस्थेला पाठीशी घालण्याचा का प्रयत्न करीत आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.