विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 12:02 PM2022-07-06T12:02:54+5:302022-07-06T12:06:20+5:30
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय वायुसेनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२२ होती. लाखो युवकांनी यात नोंदणी केली आहे.
फहीम खान
नागपूर : भारतीय सेनेच्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सेनेने विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अग्निवीराच्या भरतीची प्रक्रिया १७ सप्टेंबर २०२२ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणार आहे. त्यासाठी भारतीय सेनेने ५ जुलै ते ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत नागपूरमध्ये भारतीय सेनेसाठी होणाऱ्या भरतीमध्ये नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेदरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडस्मन दहावी पास, अग्निवीर ट्रेडस्मन आठवी पास व अग्निवीर क्लर्क, स्टोअर किपर, टेक्निकल श्रेणीतील पदे भरण्यात येतील. अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय वायुसेनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२२ होती. लाखो युवकांनी यात नोंदणी केली आहे.
- ई-मेलवर पाठविण्यात येईल प्रवेश पत्र
आर्मी रिक्रुटिंग ऑफिस नागपूरने ५ जुलै २०२२ रोजी यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. ऑनलाइन नोंदणी ५ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवर करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना भारतीय सेनेद्वारे त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर १० ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान प्रवेशपत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती सेनेच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे.