अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती
By नरेश डोंगरे | Published: August 27, 2023 11:40 PM2023-08-27T23:40:35+5:302023-08-27T23:49:28+5:30
काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते
नागपूर : अग्निवीर ही चुकीची संकल्पना असून त्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे, असे परखड मत मेजर जनरल (निवृ्त्त) इयान कार्डोझो यांनी रविवारी येथे व्यक्त केले. मेजर जनरल कार्डोझो 'काडतूस साब' म्हणून सर्वत्र ओळखले जातात. लडाख, जम्मू आणि काश्मीर स्टडिजच्या (सीएलजेकेएस) स्थानिक केंद्राने चिटणवीस सेंटर येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीएलजेकेएसच्या अध्यक्ष निवृत्त न्या. मिरा खडक्कार उपस्थित होत्या.
एका सैनिकाला भारतीय सैन्याच्या प्रत्यक्ष कार्याची ओळख होण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतात. मात्र, अग्निवीरांसाठी हा कालावधी फक्त चार वर्षांचा आहे. त्यामुळे ते भविष्यात त्रासदायक ठरू शकते. यामुळे भाडोत्री सैनिक विकसित होऊ शकतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ते घातक ठरू शकते, अशी भीतीही कार्डोझो यांनी व्यक्त केली. श्रोत्यांमध्ये बसलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गद्रे यांनीही मेजर जनरल कार्डोझो यांच्या मतांचे समर्थन केले.
कार्यक्रमात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कार्डोझो यांनी अग्निवीरांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्या या सैनिकांना सामावून घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शेवटी त्यांच्यापैकी काही जण सुरक्षा रक्षक आणि इतर तत्सम नोकऱ्या करतील.
मेजर जनरल इयान कार्डोझो हे पहिले अधिकारी आहेत ज्यांनी कमांड आणि नंतर ब्रिगेडचे नेतृत्व केले. काडतूस साब, मेजर जनरल कार्डोझो हे नाव त्यांच्या 'पल्टन' - ४ थी बटालियन आणि ५ गोरखा रेजिमेंटवरून मिळाले. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी किस्सेही सांगितले. त्यानुसार कार्डोझो १९६२ च्या भारत-चीन युद्धात आणि १९६५ तसेच १९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध लढले.
बांगलादेश मुक्तिसंग्रामातील युद्धकाळातील एक किस्सा सांगताना कार्डोझो म्हणाले की, आमच्या तुलनेत पूर्वेकडे पाकी सैन्याची मोठी तैनाती होती. मात्र, एका बातमीमुळे पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला. या युद्धादरम्यान, कार्डोझोने चुकून भूसुरुंगावर पाऊल ठेवले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. पुरेशी वैद्यकीय मदत न मिळाल्याने काडतूस साब यांनी खुकरी काढून पाय कापला. ही घटना प्रत्येकाला शौर्यकारक वाटली तरी जनरल यांना याबद्दल अधिक बोलणे आवडत नाही. त्यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी अशी वीर कृत्ये सैनिक नेहमीच करीत असतात, अशी भावना व्यक्त केली. कार्डोझो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि एनसीसी कॅडेट्सना यशाचा मंत्र देताना म्हटले, 'तुम्हाला जे आवडते ते करा; तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा; कधीही घाबरू नका आणि कधीही हार मानू नका'.
युद्धादरम्यानचा मानवतावाद
त्याच्या अपघाताशी संबंधित एक भावनिक किस्सा सांगताना, कार्डोझो म्हणाले, युद्धादरम्यान भूसुरुंगावर पाय ठेवल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी पाकिस्तानी लष्करातील डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेतले. त्याचे नाव मोहम्मद बशीर होते. डॉक्टर असल्याने त्यांनी मला आधी रुग्ण आणि उपचार केल्यानंतर शत्रू मानले. या घटनेमुळे आपण खूप काही शिकलो. त्यानंतर आयुष्यात अनेक चांगले बदल घडले. अपंगांसाठी काम करण्याची प्रेरणाही मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.