अग्रवाल, पोकुलवार, वानखेडे व गांधी महापालिकेत
By admin | Published: May 17, 2017 01:55 AM2017-05-17T01:55:13+5:302017-05-17T01:55:13+5:30
महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता, भाजपाच्या कोट्यातून चार जणांना स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे.
भाजपाचे चार स्वीकृत सदस्य जाहीर : आयुक्त करणार शिक्कामोर्तब
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता, भाजपाच्या कोट्यातून चार जणांना स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे. या चार नावांवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. यात माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, यांच्यासह किशोर वानखेडे व निशांत गांधी यांचा समावेश आहे. मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील एकालाही स्वीकृत सदस्याची संधी मिळालेली नाही.
महापालिका निवडणुकीत मुन्ना पोकुलवार यांना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. सुनील अग्रवाल यांचा प्रभाग नवीन प्रभाग रचनेत चार भागात विभागला गेला होता. त्यामुळे अग्रवाल यांना निवडणुकीत संधी मिळाली नव्हती. किशोर वानखेडे व निशांत गांधी भाजपात सक्रिय असल्याने त्यांना महापालिकेत संधी देण्यात आली आहे. स्वीकृत सदस्यत्व मिळण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्यांना मात्र संधी नाकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी दिली.
१९ मे रोजी स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली.
काँग्रेसचे नाव निश्चित नाही
संख्याबळाचा विचार करता काँग्रेसच्या कोट्यातून एकाला स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे अद्याप नाव निश्चित करण्यात आलेले नाही.
आयुक्त स्वीकारणार अर्ज
स्वीकृत सदस्यासाठी १८ मे रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १९ मे रोजी अर्जाची छाननी करून आयुक्त पात्र उमेदवारांची नावे जाहीर करतील. त्यानंतर सभागृहात महापौर स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करतील. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक घेतली होती.