शासकीय याेजनेचे आमिष दाखवून शेतजमीन हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:35+5:302021-07-14T04:11:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : वयाेवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना शासकीय याेजनेचे आमिष दाखवून गावातील रतीराम ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : वयाेवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना शासकीय याेजनेचे आमिष दाखवून गावातील रतीराम शंकर माेटघरे याने त्यांची शेतजमिनी हडपल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. यात तीन वृद्धांच्या शेतजमिनीची रजिष्ट्री लावली असून, चाैघांच्या नावे जमीन विक्रीचा करारनामा केला असल्याचा आराेप वृद्ध शेतकऱ्यांनी पाेलीस तक्रारीत केला आहे. फसवणुकीचा प्रकार तालुक्यातील भाेवरदेव येथे उघडकीस आला असून, याबाबत वृद्ध शेतकऱ्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, चाैकशीअंती गुन्हा नाेंदविला जाईल, अशी माहिती पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.
भाेवरदेव येथील रतीराम माेटघरे यांनी गावातीलच वयाेवृद्ध नागरिकांची मने जिंकून त्यांना संजय गांधी निराधार याेजना, अंत्याेदय गटातील रेशनकार्ड बनवून देणे आदी शासकीय याेजनेचे आमिष दाखवून त्यांच्याकडील कागदपत्रे गाेळा केली. सुरूवातीला त्याने वृद्धांकडून करारनामा करून घेतला व त्यानंतर त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत परस्पर शेतजमिनीची रजिष्ट्री करून घेतली. शिवाय काहींच्या नावाने शेतीचे अधिकृत करारनामे करून ठेवले हाेते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रजिष्ट्री केलेल्या एका शेतीची दुसऱ्याला विक्री केल्याची बाब एका शेतकऱ्याच्या मुलाच्या ध्यानात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाने चाैकशी केली असता, रतीराम याच्या नावानेच करारनामा केल्याचे समजले आणि हे प्रकरण उघडकीस आले. त्याने नामदेव बांडेबुचे (३.६५ आर.), सिंधू हरिश्चंद्र राघोर्ते (०.५५ आर.), टोनेश्वर बांडेबुचे (१.०२ आर) यांच्या शेतजमिनीची रजिस्ट्री करून घेतली. तर गुणराज बांडेबुचे, रामकृष्ण वंजारी (१.०२ आर), वामन रकतसिंगे (३.२२ आर.), शालू कवडू आस्वले (१.५२ आर.) हरिदास पाटील (१.६७ आर.) पांडुरंग बांडेबुचे यांच्या शेतजमिनीचा अधिकृत करारनामा करून घेतला असल्याची बाब समाेर आली आहे. टाेनेश्वर बांडेबुचे यांची १.०२ आर शेती रतीरामने परस्पर दुसऱ्याला विक्री करून दिली. त्याचा माेबदला म्हणून खरेदीदाराने १३ लाख रुपये रतीराम याच्या खात्यात जमा केले. तसेच काही शेतकऱ्यांंना धनादेश दिले असल्याची माहिती आहे. परंतु शेतकऱ्यांना शेतजमिनीचा एक रुपयाही मिळाला नसल्याचे पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी (दि.११) कुही पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. त्यानुसार कुही पाेलिसांनी रतीराम माेटघरे याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले असून, चाैकशीनंतर गुन्हा नाेंदविला जाईल, अशी माहिती पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.
....
अन् शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला
दरम्यान, साेमवारी (दि.१२) रतीराम माेटघरे याने स्वत:च्या नावाने केलेल्या शेतजमिनीचे खरेदीपत्र हे पुन्हा शेतमालकाच्या नावाने करून दिले. केलेले करारपत्रसुद्धा ज्यांचे त्यांना परत केले. त्यामुळे फसगत झालेल्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. असे असले तरी रतीरामने आणखी किती शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे उघड झाले नाही. पाेलिसांनी अद्यापही आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. संपूर्ण चाैकशी झाल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के यांनी स्पष्ट केले.