नागपूर जिल्ह्यात ब्रिटीशांनी १९१० साली सुरू केलेले कृषी संशोधन केंद्र मरणासन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:46 AM2018-02-09T11:46:06+5:302018-02-09T11:48:43+5:30
ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.
अशोक हटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि लाभ व्हावा, त्यातून शेतीमालाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, विविध पिकांवर संशोधन करून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उदात्त हेतूने ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.
या केंद्राच्या निर्मितीमुळे ब्रिटिशांची दूरदृष्टी व कल्पकतेची प्रचिती येते. सन १९१८ मध्ये या केंद्राचे शासकीय प्रायोगिक क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यात आले.
वर्षाकाठी १७ लाखांचा तोटा
या कृषी संशोधन केंद्रावर वर्षाकाठी सरासरी २५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जातो. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि मजुरांच्या मजुरीचा समावेश आहे. शिवाय, या केंद्राला दरवर्षी २ लाख ३५ हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान दिले जाते. या केंद्राच्या मालकीच्या शेतीतून वर्षाकाठी अधिकाधिक सरासरी ८ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे या केंद्राला वर्षाकाठी १६ लाख ९७ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
दर्जेदार बियाण्याची निर्मिती
या केंद्रात दर्जेदार बियाण्याची निर्मिती केली जाते. सन २०१७-१८ मध्ये येथील पाच हेक्टरवर ‘पीके व्ही-एचएमटी’ या धानाच्या प्रमाणित वाणाचे पाच हेक्टरमध्ये ८२.१५ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-एचएमटी’ सत्यप्रत (फाऊंडेशन सीड) वाणाचे १.४० हेक्टरमध्ये ४.६८ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-किसान’ सत्यप्रत वाणाचे दोन हेक्टरमध्ये १३.६८ क्विंटल उत्पादन झाले. हे सर्व बियाणे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची तपासणी केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते. या केंद्रातील गहू प्रति किलो ३० रुपये, तूर ११० रुपये, बोरू व ढेंचा ४० रुपये जवस ६० रुपये आणि हरभरा ९० रुपये प्रतिकिलोने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. तरीही या केंद्राला दरवर्षी तोटा होतो.
किमती अवजारे गंजली
या केंद्राच्या इमारतीवर १० वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. येथे महागडी शेतीपयोगी अवजारेदखील आहेत. परंतु, अनास्थेमुळे ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टीवेटर, पेरणीयंत्र, बैलगाडी, मल्चर यासह अन्य शेतीपयोगी साहित्य व जीप उघड्यावर सडत आहे. येथील रोटावेटर हे २५ वर्षांपूर्वीचे आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे.