कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

By admin | Published: May 28, 2017 02:35 AM2017-05-28T02:35:08+5:302017-05-28T02:35:08+5:30

शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर,...

The agricultural sector will be revolutionized | कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

Next

बनवारीलाल पुरोहित : नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कोरडवाहू शेती करणारा शेतकरीही प्रगती करू शकेल. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून येईल, असा विश्वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला.
नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल मुताने, खा. अशोक नेते, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे महापौर संजय नरोणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, किशोर धारिया, उद्योगपती दिलीप गोसल, सुधाकर शेट्टी उपस्थित होते.
बनवारीलाल पुरोहित म्हणाले, आज पाण्याचा सिंचनासाठी अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या विकास केंद्राने पाण्याच्या वापरासोबतच संत्रा, मोसंबी, टमाटर यासह अन्य फळे व पिकांवर प्रक्रिया करण्याची तसेच त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकविण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात सदैव शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार घोळत असतो. ते रस्त्याचे लोकार्पण करायला जरी आले असले तरी त्यामागे त्यांचा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू असतो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देशातील उद्योगपत्यांपेक्षा मोठे होऊ शकतात. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्र करणार आहे. शेतकऱ्यांनी ते विकते तेच पिकविले पाहिजे. गिरीश गांधी हे ध्येयवेडे आहेत. त्यांनी ही नितीन गडकरी यांना दिलेली सर्वोत्तम भेट होय, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर बंडोपंत उमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी, कारंजा (घाडगे), आर्वी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्पादकता वाढविण्यासाठी
कौशल्य विकास आवश्यक - पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणत्याही बाबीची उत्पादकता वाढविण्यासाठी त्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. याला शेतीक्षेत्रही अपवाद नाही. गिरीश गांधी यांनी नेमकी हीच बाब हेरून या विकास केंद्राची निर्मिती केली. यासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही. या विकास केंद्राचा फायदा संपूर्ण विर्दभातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात दोन मेगावॅट क्षमतेचे छोटेछोटे सौरऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हा नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे होणार असल्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

 

Web Title: The agricultural sector will be revolutionized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.