कृषी विद्यापीठांना बार्टी फेलोशिपमधून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:12+5:302021-05-21T04:09:12+5:30
उदय अंधारे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
उदय अंधारे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपमधून वगळले आहे. या विद्यापीठांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांत रोष निर्माण झाला आहे.
बार्टीतर्फे २०१३ मध्ये ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. राज्यातील रहिवासी आणि विविध विद्यापीठांमधील तांत्रिक अभ्यासक्रमात पीएच.डी. करीत असलेले अनुसूचित जातीचे विद्यार्थी या फेलोशिपकरिता पात्र आहेत. बार्टीने गेल्या जानेवारीत जाहिरात प्रकाशित करून ज्युनियर व सिनियर रिसर्च फेलोशिपकरिता अर्ज मागवले आहेत. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कद्वारे जाहीर पहिल्या सर्वोत्तम १०० संस्थांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपमधून वगळण्यात आले आहे. असे करताना कृषी विद्यापीठे इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्चद्वारे नियंत्रित केली जातात आणि कौन्सिल त्यांची स्वतंत्र रँकिंग जाहीर करते, या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
अॅग्रीकल्चरल डॉक्टरेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ९ मार्च रोजी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गजभिये यांनी कृषी विद्यापीठांचा फेलोशिप कार्यक्रमात समावेश करण्याची ग्वाही दिली होती, परंतु पुढे काहीच झाले नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी गजभिये यांना मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.
---------------
यावर्षी केवळ २३ पीएच.डी. विद्यार्थी
यावर्षी बार्टीने १०६ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर केले आहे. त्यातुलनेत कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीचे केवळ २३ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. २०१८ मध्ये समान फेलोशिपकरिता ४०८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यावेळी प्रवेश परीक्षा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करिता नोंदणी केली होती.