शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:01 AM2018-04-22T00:01:24+5:302018-04-22T00:01:36+5:30

शेती आणि शेतीशी संबंधित पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड दिल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी समृद्ध होतील आणि आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

Agriculture and milk development should be linked to scientific revolution | शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड हवी

शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड हवी

Next
ठळक मुद्देनितीन गडकरी : वैज्ञानिक पशु संगोपन पद्धतीवर शेतकरीभिमुख कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेती आणि शेतीशी संबंधित पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड दिल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी समृद्ध होतील आणि आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्यावतीने (एनडीडीबी) शनिवारी एक दिवसीय विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प वैज्ञानिक पशुसंगोपन पद्धतीवर शेतकरीभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे, विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे संचालक रवींद्र ठाकरे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष डॉ. दिलीप रथ, कार्यकारी संचालक वाय.वाय. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल तर त्यास बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. विदर्भात आजही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन त्यातील सेंद्रीय कार्बन कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत, गांढूळ खत, शेणखताचा वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता व उपजाऊपणा वाढविण्यास मदत होईल. गडकरी म्हणाले, रासायनिक द्रव्ये नष्ट केलेल्या पाण्याचा उपयोग केल्यास ते शेती व जनावरास फायदेशीर ठरते. विशेषत: दुधारू जनावरांना जास्तीत-जास्त शुद्ध व स्वच्छ पाणी दिल्यास दुधाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन वाढविण्यास मदत मिळते. त्यामुळे शेतकºयांनी पाण्याची नियमित चाचणी करावी. मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाळू जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने १५ हजार कोटी रुपये मंजूर करून १०८ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विदर्भातील ८३ प्रकल्पाचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाड्यात दूध उत्पादन जास्त आहे, पण मार्केटिंगची सोय नाही. त्यामुळे विमान वाहतूक तसेच वर्धेतील ड्रायपोर्टद्वारे विदर्भातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना विदेशात पाठविण्यावर भर दिला जाणार आहे.
मदर डेअरीने चिल्लर दूध विक्री केंद्र लवकर सुरू करावेत आणि सरकारी दूध विक्री केंद्र माजी सैनिकांना आणि संस्थांना द्यावेत तसेच विदर्भात मदर डेअरीचे उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
२७,३२६ दूध उत्पादक
विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून दोन्ही विभागात ३०२३ गावांची निवड केली आहे. आतापर्यत २७,३२६ शेतकऱ्यांच्या खात्यात १५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सध्या १,३७८ गावांमध्ये ९५२ दूध संकलन केंद्र आहेत.
डॉ. दिलीप रथ म्हणाले, विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील तीन अशा नऊ जिल्ह्यातील १४०० गावांमध्ये २७ हजारांहून अधिक शेतकरी दररोज २ लाख १० हजार लिटर दूध गोळा करीत आहेत. पुढील काळात ११ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्प राबवून दररोज किमान २५ लाख लिटरपर्यंत दूध संकलित करण्याचा मानस आहे. वाय. वाय. पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. संचालन शिल्पा बेहरे यांनी केले.

 

Web Title: Agriculture and milk development should be linked to scientific revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.