नागपुरात शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट ग्राहकांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:58 PM2019-01-12T22:58:44+5:302019-01-12T23:02:57+5:30
शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
कृषी विद्यापीठ परिसरात शनिवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू झाला असून, या ठिकाणी शेतमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा महोत्सव बुधवार १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, उद्घाटनाच्या दिवशी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद देत कृषिमालाची खरेदी केली. भरपूर पोषणतत्त्व आणि राज्यात प्रथमच पिकविण्यात आलेल्या ब्लॅक राईसला ग्राहकांनी प्रथम पसंती दिली आहे.
या ठिकाणी कृषी उत्पादित मालासोबतच गृहोद्योग आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषीउत्पादनावर प्रक्रिया करून विविध प्रकारची चटणी, लोणचे, फळांचे मुरब्बे, पापड, कुरडया, फळे, भाजीपाला, मध, पपई, विविध वाणांचा तांदूळ, गहू, हरभरा, बटाटे, संत्री, मोसंबी यासह अनेकविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचे २०० वर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, कृषी पणन, फुलशेती, खादी ग्रामोद्योग, कापूस संशोधन केंद्र, महाबीज आदी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे कृषीशी निगडित विभागांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत.
या जिल्हा कृषी महोत्सवाचे आमदार नागो गाणार व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या. या महोत्सवात सर्व दिवस विविध कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, भारत संचार निगम, जिल्हा परिषद, संशोधन संस्था आदी स्टॉल आहेत. या महोत्सवात ४६ शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटांकडून सेंद्रिय माल प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गटसंस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे.