राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

By आनंद डेकाटे | Published: October 2, 2023 06:33 PM2023-10-02T18:33:17+5:302023-10-02T18:34:04+5:30

नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची कृषि मंत्र्यांकडून पाहणी

Agriculture Minister Dhananjay Munde will deposit crop insurance advance in the accounts of farmers in the state before Diwali | राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

googlenewsNext

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य
शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता.

नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषीमंत्र्यांनी आज स्वतः शेताच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी अडयाळी, उमरगाव, पाचगाव, विरखंडी या गावांना प्रामुख्याने भेटी दिल्या. तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांचे शेतकरी बांधवांनी स्वागत केले. तसेच मागणीची निवेदने सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून पहाणी केली.

जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांनी सोयाबीनवर आलेल्या पिवळ्या मोजाक व्हायरस या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांना दाखविले. तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याची आपबीती शेतकऱ्यांनी सांगितली. यावेळी कृषी मंत्र्यानी बांधावरच शेतकऱ्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले, यावर्षी राज्यात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतरपिकाच्या सुद्धा विमा काढण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्र शासनाने एक रुपया शेतकऱ्याला भरायला सांगितला होता. उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनाने भरला आहे. देशात हे पाहिले उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची २५ टक्के रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे. याशिवाय ६५ मिलीमीटर पेक्षा सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा  अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, असेल तिथे राज्य आपदा मदत निधी (एसडीआरएफ) व केंद्रीय आपदा मदत निधीच्या (एनडीआरएफ) नियमानुसार शेतकऱ्यांना मदत करता येते. ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहे. उद्या मंगळवारी राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय मांडणार असून यावर तात्काळ निर्णय होईल. 

८२ मंडळांना फटका

नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महसूल विभागाच्या विभागणीतील ८२ मंडळातील पिकांना फटका बसला आहे. त्यातही ६२ मंडळ अधिक बाधित झाली आहे. यासंदर्भातील महसूल व कृषी विभागाचा अद्यावत प्रस्ताव राज्य शासनाने मागितला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वर्षी मदत देताना राज्य शासन जून महिन्यात झालेल्या पिकाचे नुकसान, २१ दिवस जिथे पावसाचा खंड पडला आहे. त्या ठिकाणाचे नुकसान, तसेच नागपूर व विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या तीन घटकांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असून त्यांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबद्दल मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री अतिशय गंभीर असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतल्या जाईल, असे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

कुही तालुक्यातील विरखंडी या गावातील शेतकरी दिनेश पडोळे यांच्या शेतामध्ये त्यांनी बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे पऱ्हाटीवर झालेल्या दुष्परिणामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नेमके कोणते रासायनिक खत वापरण्यात आले. त्यामुळे नुकसान कशाप्रकारे झाले? याचा तपास घेण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.  दौऱ्यामध्ये खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदींसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Agriculture Minister Dhananjay Munde will deposit crop insurance advance in the accounts of farmers in the state before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.