अमरावती विभागात पाच कीटकनाशकांवर बंदीचे कृषीमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 05:57 AM2019-09-20T05:57:02+5:302019-09-20T05:57:22+5:30
जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.
नागपूर : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेच्या घटनांची गंभीर दखल घेऊन अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.
बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सीपरमेथ्रीन ४० टक्के ईसी, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्युजी, असिफेट ७५ टक्के एससी, डीफेन्थीरोन ५० टक्के डब्ल्युपी, मोनोक्रोटोफॉस ३३६ टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनांची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.
>लोकमत इम्पॅक्ट : बुधवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत लोकमतच्या प्रतिनिधीने या विषयाकडे कृषिमंत्र्यांंचे लक्ष वेधत कीटकनाशकांवर बंदी घालणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या आदेशांवर ७ दिवसांपूर्वीच स्वाक्षरी केल्याचे सांगितले होते. परंतु अधिकाऱ्यांनी आदेश काढले नव्हते. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून आदेश काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरूवारी बंदीबाबतचे नोटिफिकेशन तातडीने काढण्यात आले, हे विशेष.