कृषी अधिकाऱ्यांनी केली नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:32+5:302021-03-21T04:09:32+5:30
काेंढाळी : अवकाळी व वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे काेंढाळी (ता. काटाेल) परिसरातील विविध पिकांचे माेठे नुकसान झाले. कृषी विभागाच्या ...
काेंढाळी : अवकाळी व वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे काेंढाळी (ता. काटाेल) परिसरातील विविध पिकांचे माेठे नुकसान झाले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह चमूने शनिवारी नुकसानग्रस्त शेताला भेटी देत या नुकसानीची पाहणी केली.
काटाेल तालुक्यातील काेंढाळी, मासोद, कामठी, धुरखेडा, पुसागोंदी, बोरगाव या गावांसह शिवारात गुरुवार (दि. १८) व शुक्रवारी (दि. १९) वादळासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शिवाय, गारपीटही झाली. त्यामुळे या भागातील गहू, हरभऱ्यासह काेबी, टाेमॅटाे, पालक, मेथी व इतर भाजीपाल्याच्या पिकांचे तसेच संत्रा, माेसंबी व आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना माेठा फटका बसला.
दरम्यान, तालुका कृषी विभागाच्या चमूने शनिवारी मासोद, कामठी, पुसागोंदी, धुरखेडा शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. या चमूत काटाेल येथील तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. नैसर्गिक आपत्तीमुळे काटाेल तालुक्यातील शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान हाेत आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती याेगेश चाफले, मासाेद येथील शेतकरी प्रमाेद धारपुरे, प्रमाेद चाफले यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.