अॅग्रोव्हिजन ११ नोव्हेंबरपासून
By admin | Published: October 17, 2016 02:52 AM2016-10-17T02:52:13+5:302016-10-17T02:52:13+5:30
शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे, कृषी क्षेत्रात होणारे संशोधन व प्रगतीची माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात
केंद्रीय मंत्र्यांसह तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणार
नागपूर : शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे, कृषी क्षेत्रात होणारे संशोधन व प्रगतीची माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’ ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
गडकरी यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत, आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल, केंद्रीय खते व रसायन मंत्री अनंतकुमार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. १२ नोव्हेंबर रोजी आयोेजित कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते होईल. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी उपस्थित राहतील.
अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, एम.एम. अॅक्टीव्ह, पूर्ती समूह, एमईडीसी व वेद यांच्यातर्फे दरवर्षी ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजन केले जाते. यंदाचे आठवे वर्ष आहे.
गेल्यावर्षी सुमारे ५० लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. यावर्षी प्रदर्शनात ४०० हून अधिक कंपन्या सहभागी होतील.
येथे शेतकऱ्यांना बियाणे, खते, शेती अवजारे, यांत्रिक अवजारे, सिंचनासाठी लागणारे साहित्य, शेड नेट इत्यादीची माहिती मिळेल. कार्यशाळेदरम्यान दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, बकरी पालन, रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय, फळ उत्पादन व प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञांद्वारे माहिती दिली जाईल. यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय अभ्यास ट्रीप आयोजित केली जाईल. याशिवाय एखाद्या व्यक्तीने काही विशेष प्रयोग केले असतील तर त्यांनाही ते दाखविण्यासाठी प्रदर्शनात जागा दिली जाईल. उत्तम प्रयोगाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, ‘अॅग्रोव्हिजन’ समितीचे सल्लागार अध्यक्ष डॉ.सी.डी.मयी, संयोजक गिरीश गांधी, सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, अंकुर सिड्सचे माधवराव शेंबेकर उपस्थित होते. (वा. प्र.)