अॅग्रो व्हिजन : मधुमक्षिका पेटी ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:11 AM2018-11-25T00:11:17+5:302018-11-25T00:12:21+5:30
बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, विक्रीसाठी मधही मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतोय. अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासंदर्भात मधुमक्षिका पेटी स्टॉल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, विक्रीसाठी मधही मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतोय.
अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासंदर्भात मधुमक्षिका पेटी स्टॉल आहे. बारामती येथे मधुमक्षिका पेटी तयार करण्यात येत आहे. या पेटीच्या माध्यमातून शेतातील पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही पेटी केवळ बारामती येथेच उपलध आहे. सध्या या पेटीबाबत विविध कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. या पेटीत राणी माशी सोडल्यास ती दिवसाला ३५० ते ४०० अंडी देते. प्रक्रिया होऊन माशा मोठ्या व्हायला साधारणत: १५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर पेटीतील माशा शेताच्या मध्यभागी सोडल्या जातात. शेतात १०० फुले लागली असल्यास १०० फळे लागतीलच याची शाश्वती नसते. कारण, फुलांमध्ये परागभवन झालेले नसते. त्यामुळे एक-एक माशी प्रत्येक फुलावर बसल्यास १०० टक्के परागभवन होऊन फळधारणा होईल. परिणामी, शेतातील उत्पन्नात आपसूकच भर पडेल. माशा शेतात सोडताना त्या अंगावर येऊ नये म्हणून एक स्वतंत्र धूर पसरविण्याचे यंत्रही पेटीसोबत आहे. शेणखतात थोडा जळता कोळसा टाकल्यास धूर बाहेर पडेल. या धुरामुळे माशा अंगावर येऊन चावणार नाहीत. याशिवाय माशांपासून सुरक्षा करणारी संरक्षण किटसुद्धा उपलब्ध आहे. मधुमक्षिका पेटीमुळे मध मिळत असल्याने ते विकून दोन पैसे अधिक मिळतील, असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांचा आहे.