नागपुरात २२ नोव्हेंबरपासून ‘अॅग्रोव्हिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:52 AM2019-09-09T11:52:54+5:302019-09-09T11:54:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन यंदा २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. यंदा प्रदर्शनाच्या आयोजनाचे ११ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. याशिवाय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरीराज सिंह, अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिम्रत कौर बादल, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी व ‘अॅग्रोव्हिजन’चे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली.
रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेला संयोजक डॉ. गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, आयोजन सचिव रमेश मानकर, ‘एमएसएमई’ विकास संस्थेचे संचालक पी.एम.पार्लेवार प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा ‘अॅग्रोव्हिजन’चे ११ वे वर्ष असून आयोजन जास्त भव्य स्वरुपात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील बदल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पशुपालनातील संधी इत्यादींबाबत सखोल माहिती मिळेल. येथे ३५० हून अधिक ‘स्टॉल्स’ राहणार आहेत.
सोबतच कृषिज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाचे सीमोल्लंघन ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयांवरील चर्चासत्र, यांचेदेखील आयोजन होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
‘अॅग्रोव्हिजन’मध्ये २८ हून विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. उत्पादन तंत्रज्ञान, शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा आणि पायाभूत सुविधा यांच्यावर या कार्यशाळा आधारित असतील. सोबतच शेतकऱ्यांच्या यशोगाथादेखील ऐकण्याची संधी मिळेल.