मान्सून अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ॲक्शन मोडवर, विकासप्रकल्पांचा घेतला आढावा
By योगेश पांडे | Published: June 18, 2024 05:00 PM2024-06-18T17:00:53+5:302024-06-18T17:01:20+5:30
प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेत पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या केल्या सूचना
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मान्सूनच्या पहिल्याच पावसात मनपाच्या तयारीची पोलखोल झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध विकासप्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार नाही यादृष्टीने पावले उचलण्याची सूचना केली.
सोमवारी आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मन:स्ताप झाला. मागील वर्षी एकाच दिवसात झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील पॉश वस्त्यांमध्ये पाणी शिरून हाहा:कार उडाला होता. यावर्षी तशी स्थिती येऊ नये यासाठी अंबाझरी तलावाजवळ कामाला सुरुवात झाली आहे. शहरात अनेक विकासकामे सुरू असून आचारसंहितेचा त्यांना फटका बसला होता. अनेक सिमेंट रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळ्यात या सर्व ठिकाणी नागरिक व प्रशासनाची परीक्षा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी रविभवन येथे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीत नागनदी प्रकल्प सद्यस्थिती, ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील सर्व प्रस्तावित प्रकल्प, दहीबाजार, लोहाओळी, पोहाओळ, अनाज बाजार, कॉटन मार्केट, संत्री मार्केट, नेताजी मार्केट, डिक दवाखाना या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती, ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर सद्यस्थिती, रामजी पहेलवान रस्ता, एलआयसी चौक, जुना भंडारा रोड येथील भूसंपादन, रेल्वे स्टेशन समोरील रस्ता व दुकानदारांचे पुनर्वसन, कल्याणेश्वर मंदिर पुनर्विकास प्रकल्प, गोकुळपेठ बाजार पुनर्विकास प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज प्रकल्प या विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. काही प्रकल्पांमध्ये उणीवा असून त्यामुळे जनतेत नाराजी आहे. त्या उणीवा दूर करून कामाला गती देण्याची सूचना गडकरी यांनी केली.