अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशावर चाकूहल्ला; नागपूरचा प्रवासी गंभीर, दुर्गजवळ घटना
By नरेश डोंगरे | Updated: February 3, 2025 23:14 IST2025-02-03T23:14:21+5:302025-02-03T23:14:32+5:30
नागपूरच्या एका मजुरावर गुंडांनी चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशावर चाकूहल्ला; नागपूरचा प्रवासी गंभीर, दुर्गजवळ घटना
नागपूर : अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या नागपूरच्या एका मजुरावर गुंडांनी चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रविवारी रात्री १०:२५ च्या सुमारास दुर्ग (छत्तीसगड)जवळ ही घटना घडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मानवेल पत्रस चरगट (वय ३०) हा अंबिकापूर - बलरामपूर येथील मूळ निवासी आहे. तो नागपुरात एका बांधकामस्थळी कामावर आहे. रविवारी तो आपल्या गावाला जाण्यासाठी अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये चढला. रात्री १०:२५ वाजता ग्रीन सिग्नल न मिळाल्याने ही गाडी दुर्ग रेल्वे स्थानकाजवळ आऊटरला उभी होती. त्यामुळे काही प्रवासी खाली उतरले. मानवेल हादेखील लघुशंकेसाठी खाली उतरला. तेवढ्यात अचानक काही जणांनी त्याच्यावर चाकूहल्ला केला. चाकूचे वार बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्याचवेळी गाडी पुढे निघाल्याने मानवेल कसाबसा गाडीत चढला.
आरपीएफमुळे घटना उघड
दुर्ग स्थानकावर फलाटावरून जात असताना आरपीएफ जवानांनी त्याला जखमी अवस्थेत बघितल्यानंतर त्याची चाैकशी केली. त्यानंतर चाकूहल्ल्याची ही घटना उघडकीस आली. रेल्वे पोलिसांनी मानवेलची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला. त्याला उपचारासाठी शासकीय इस्पितळातही दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला
गेल्या महिन्यात अशीच एक घटना दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाडीत घडली होती. चार गुन्हेगारांनी एका मजुराची आधी रक्कम चोरली आणि ती परत मागितली म्हणून त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या मजुराचा जीव गेला होता. या घटनेमुळे रेल्वे गाड्यांतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.