उष्माघात टाळण्यासाठी ‘अहमदाबाद पॅटर्न’
By admin | Published: May 10, 2015 02:17 AM2015-05-10T02:17:20+5:302015-05-10T02:17:20+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघातामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघातामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर आळा घालण्यासाठी अहमदाबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर शहरात उष्माघात कृती आराखडा (हिट अॅक्शन प्लॅन) राबविला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी शनिवारी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मनपाचे आरोग्य उपसंचालक मिलिंद गणवीर उपस्थित होते.
मागील काही वर्षांत उन्हाळ्यात झालेले मृत्यू व त्या दिवसाचे तापमान याची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत कृती आराखडा तयार करून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्याचे सादरीकरण केले जाईल. गरज भासल्यास त्यात आवश्यक सुधारणा करून तो २०१६ च्या उन्हाळ्यात लागू केला जाईल. नागपूरपाठोपाठ राज्यातील चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, जळगाव, बीड व नांदेड आदी शहरातही हा आराखडा राबविला जाणार आहे. कृती आराखडा तयार करताना हवामान, पोलीस विभाग, बांधकाम व पर्यावरण क्षेत्रातील संघटना, शासकीय व खासगी वैद्यकीय संस्था यांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तापमानाचा त्रास विचारात घेता सूतिकागृहात नवजात शिशू विभाग, गरोदर महिलांचा वॉर्ड इमारतीच्या वरच्या माळ्यावर असू नये, अशा स्वरूपाच्या सूचना महापालिक ांना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागामार्फत तापमानाची माहिती दिली जाते. पुढील आठवड्याच्या संभाव्य तापमानावरून गरज भासल्यास आरोग्य विभागामार्फत लोकांना खबरदारीच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती सौनिक यांनी दिली.(प्रतिनिधी)