‘एम्स’ विमा रुग्णालयात!
By admin | Published: August 10, 2016 02:16 AM2016-08-10T02:16:52+5:302016-08-10T02:16:52+5:30
आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) मिहानमधील १५० एकरची जागा केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब ...
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेची चमू येणार : सुरुवातीला एमबीबीएसच्या ५० जागा
नागपूर : आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) मिहानमधील १५० एकरची जागा केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरित होताच ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटंसी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ने, (एचएससीसी) प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली आहे. तर, २०१६-१७ या वर्षात ‘एम्स’साठी आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला सुरुवात होणार आहे. त्याकरिता सक्करदरा येथील राज्य विमा मंडळाचे रुग्णालय तर महाविद्यालयासाठी तीन संस्थांवर शोध थांबला आहे. या संदर्भातील अहवाल पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेला पाठविण्यात आला असून येत्या १०-१५ दिवसांत त्यांची चमू येण्याची शक्यता आहे.
‘एम्स’ची जागा हस्तांतरित होताच ३० एप्रिलपासून संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यातील अडथळे दूर करण्यासाठी ३ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परिणामी, नुकतेच आठ कोटी रुपये मंजूर झाले असून विकासकामाला पाठबळ मिळाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, पुढील वर्षीपासून ‘एम्स’ला आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला सुरुवात होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात एमबीबीएसच्या ५० जागा भरल्या जातील. यासाठी रुग्णालय व कॉलेज इमारतीच्या जागेचा शोध नुकताच थांबला आहे. ‘एम्स समन्वय समिती’ने सक्करदरा येथील विमा रुग्णालयाला प्राधान्य दिले आहे. तर कॉलेज इमारतीसाठी एक शासकीय व दोन खासगी संस्थांना पसंती दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे येत्या १०-१५ दिवसांत ही चमू येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या निर्णयानंतरच ‘एम्स’ची पुढील वाटचाल ठरणार आहे. (प्रतिनिधी)