नागपुरातील 'एम्स'ची आंतररुग्ण सेवा जुलैपासून : विभा दत्ता यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 07:56 PM2020-01-31T19:56:01+5:302020-01-31T19:58:53+5:30
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी होत असताना आता आंतररुग्ण विभागाला (आयपीडी) जुलै २०२० पासून सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी होत असताना आता आंतररुग्ण विभागाला (आयपीडी) जुलै २०२० पासून सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे. येथे ३०० खाटांची सोय राहणार असून ‘मॉड्युलर’ शस्त्रक्रिया गृह, एमआरआय, सिटीस्कॅन, लिनिअर अॅक्सलरेटर आदींची अद्ययावत यंत्रसामुग्री असणार आहे, अशी माहिती एम्सच्या संचालक व मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
‘एम्स’चा द्वितीय स्थापना दिनाच्या कार्यक्रम २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. दत्ता म्हणाल्या, ‘एम्स’चा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. याच महिन्यात ‘डे केअर सेंटर’ला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ओपीडी, आयुष कॉम्प्लेक्स, धर्मशाळा, व्याख्यान सभागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय, बहुमजली कर्मचारी निवासी इमारत व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, नेत्ररोग, नाक-कान-घसा विभाग, अस्थिरोग, त्वचारोग व मानसशास्त्र विभागातून ‘ओपीडी’सेवा दिली जात आहे. रुग्णाच्या मदतीला समाजसेवक उपलब्ध करून दिले आहे. रोज ४०० वर रुग्णांना सेवा दिली जात आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत सुपर स्पेशालिटी सेवा
डॉ. दत्ता म्हणाल्या या वर्षाच्या अखेरपर्यंत गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, कार्डीओलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, ऑन्कोलॉजी या विभागातून सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून दिली जाईल. जुलै २०२१ पर्यंत पूर्ण क्षमतेने हा विभाग रुग्णसेवेत असेल.
नंदनवन व बेला प्राथमिक आरोग्य केंद्र घेतले दत्तक
सामुदायिक आरोग्य सेवेसाठी ‘एम्स’ नागपूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या वर्षीच नंदनवन येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व बेला ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी एम्स डॉक्टर नियमित सेवा देत आहे. मानसिक आजाराचे रुग्ण पाहता ‘स्ट्रेस क्लिनीक’ सुद्धा सुरू करण्यात आले आहे. आरोग्य सेविका (एएनएम) व आशा वर्करला प्रशिक्षणही दिले जात असल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले.
कोरोना विषाणूसाठी दोन खाटा
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून एम्समध्ये दोन खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या या विषाणूवर कुठलीही लस किंवा प्रतिजैविक औषधे उपलब्ध नाहीत. या आजाराला लक्षणानुसार उपचार द्यावे लागतात.