नागपुरातील दोन दिवसापासून एम्सची लॅब बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:30 PM2020-09-03T20:30:26+5:302020-09-03T20:33:17+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून चाचण्या बंद पडल्या आहेत. मेयो, मेडिकलसह इतर प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफही आता कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. परिणामी, रुग्णसेवेला फटका बसत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून चाचण्या बंद पडल्या आहेत. मेयो, मेडिकलसह इतर प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढला आहे.
नागपुरात सुरुवातीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेतच कोरोनाची तपासणी व्हायची. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) प्रयोगशाळेत चाचणीला सुरुवात झाली. ३ एप्रिल रोजी मेयोच्या प्रयोशाळेतील आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणाऱ्या यंत्रात बिघाड आले. यामुळे रातोरात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी एम्सच्या संचालक व मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून ते आतापर्यंत, सलग चार महिने २४ बाय ७नुसार प्रयोगशाळा सुरू होती. रोज २५०वर नमुने तपासले जात होते. अचानक प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ काही लक्षणे आढळून आल्याने त्यांनी आपली चाचणी केली असता सर्वच पॉझिटिव्ह आले. परिणामी, १ सप्टेंबरपासून प्रयोगशाळा बंद आहे.
रोज सहा हजारावर तपासण्या
नागपूर शहरात मेयो, मेडिकल, एम्ससह नीरी, माफसू व चार खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली जात आहे. रोज सहा हजारावर तपासण्या होत आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार वाढला आहे. यात प्रयोगशाळेतील डॉक्टर व तंत्रज्ञ पॉझिटिव्ह येत असल्याने तपासण्याचा वेग मंदावला आहे.
एम्समध्ये वाढल्या ऑक्सिजनच्या खाटा
एम्समध्ये कोरोनाबाधितांठी ५० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड आहे. यातील १९ खाटांवरच ऑक्सिजनची सोय होती. परंतु आता रुग्णांची वाढती संख्या व गरज पाहून उर्वरित ३१ खाटांपर्यंत ऑक्सिजन पाईपलाईन पोहचविण्यात आली आहे. याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
एम्सच्या रुग्णांवर कसा होणार उपचार?
शासनाच्या निर्देशानुसार, एम्सचे डॉक्टर इतर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णसेवेत पाठविण्यात आले आहेत. परिणामी, रुग्णसेवेचा मोठा ताण मोजक्याच डॉक्टरांवर आला आहे. कोरोनाबाधितांना सेवा द्यायची कशी, या अडचणीत एम्स प्रशासन सापडले आहे. परिणामी, कोविडच्या खाटा वाढविण्यापासून ते इतर कामे खोळंबल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
प्रयोगशाळा सुरू होणार
एम्सच्या प्रयोगशाळेतील डॉक्टर व तंत्रज्ञ कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रयोगशाळा बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी प्रयोगशाळा सॅनिटाइझ करण्यात आली. उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-डॉ. विभा दत्ता
संचालक, एम्स