एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना
By सुमेध वाघमार | Published: January 22, 2024 10:07 PM2024-01-22T22:07:47+5:302024-01-22T22:07:57+5:30
सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली.
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) उपचारासाठी भरती असलेल्या ७१ वर्षीय रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे हे दुसरे प्रकरण असून, रुग्णालय प्रशासनाचा हा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे.
मांगली नागपूर येथील रहिवासी नामदेव लहानू मोहोड (७१) असे मृत रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी त्यांना ‘एम्स’ला दाखल केले. त्यांचा यकृतवर मास वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यांना पाचव्या मजल्यावरील जनरल सर्जरीचा ५०३ वॉर्डात भरती करण्यात आले होते. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली. या घटनेने ‘एम्स’मध्ये खळबळ उडाली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
२०२२मध्येही रुग्णाने केली होती आत्महत्या
कोरोनाचा दुसºया लाटेत, २०२२ मध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एका तरुणाने आजाराला कं टाळून पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. हा रुग्ण ५०५ क्रमांकाच्या वॉर्डात भरती होता.
रुग्णालय प्रशासन जागे कधी होणार?
प्राप्त माहितीनुसार, २०२२मध्ये तरुणाचा आत्महत्येनंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने रुग्णालय इमारत देखभालीची जबाबदारी असलेल्या ‘सुप्रिटेन्डन इंजिनीअर’ला खिडक्यांना ग्रील्स लावण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु दोन वर्षे लोटली. अद्यापही ग्रील्स लावण्यात आलेले नाहीत. हा रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. आतातरी रुग्णालय प्रशासन जागे होणार का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.