तंबाखू नियंत्रणासाठी एम्सचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:34 PM2019-06-15T22:34:57+5:302019-06-15T22:36:17+5:30
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा रुग्णांच्या उपचारासह या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह महापालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित तंबाखू नियंत्रणासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स) ने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा रुग्णांच्या उपचारासह या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह महापालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित तंबाखू नियंत्रणासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स) ने पुढाकार घेतला आहे.
मनपाचा आरोग्य विभाग व टाटा ट्रस्टच्या वतीने शनिवारी मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखू नियंत्रणाबाबत क्षमता निर्माण कार्यशाळा एम्सच्या मेजर जनरल डॉ. विभा दत्त यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईनमधील हॉटेलात आयोजित करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. के.बी.तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी एम्सच्या सामुदायिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
संपूर्ण देशासह नागपूर शहरातही तंबाखूजन्य पदार्थांचा प्रभाव वाढत आहे. परिणामी कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागरुक असणे आवश्यक आहे. रुग्णांच्या उपचारासह त्यांचे समुपदेशनही होणे महत्त्वाचे आहे. केवळ रुग्ण बरे करणे हाच उद्देश न ठेवता तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असल्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
मोठ्या आजारांसाठी रुग्णांच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरतात. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सवयी विचारणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र अवघे ५० टक्के डॉक्टरच रुग्णांच्या सवयी विचारून त्याची नोंद घेतात. ही गरज लक्षात घेउन डॉक्टरांनी रुग्णांच्या सवयी विचारून त्या कशा धोकादायक आहेत व सोडविण्यात याव्यात यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. केवळ उपचार न करता जनजागृती करून व्यसनावर आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.