सीआयएसएफच्या जवानामुळे टळली एअर ॲम्ब्युलन्सची दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:14+5:302021-05-08T04:09:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई विमानतळावरचा गुरुवारी रात्रीचा थरार देशभर चर्चेला आला आहे. वैमानिकाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. ...

Air ambulance accident averted by CISF personnel | सीआयएसएफच्या जवानामुळे टळली एअर ॲम्ब्युलन्सची दुर्घटना

सीआयएसएफच्या जवानामुळे टळली एअर ॲम्ब्युलन्सची दुर्घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबई विमानतळावरचा गुरुवारी रात्रीचा थरार देशभर चर्चेला आला आहे. वैमानिकाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ही दुर्घटना टाळण्यासाठी ज्यांनी सर्वप्रथम पाऊल उचलले त्या जवानाचे नाव रविकांत आवला असून ते सीआयएसएफच्या नागपूर एअरपोर्ट युनिटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच एक मोठी विमान दुर्घटना टळली. वॉच टॉवरवरून एअर ॲम्ब्युलन्सवर लक्ष ठेवणाऱ्या आवला यांना चाक निखळून पडल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर तातडीने विमानतळाला अलर्ट देण्यात आला.

एअर ॲम्ब्युलन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवालदार रविकांत आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रविकुमार जी. यांना ॲम्ब्युलन्सचे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रविकुमार यांनी तत्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी ॲथॉरिटीसोबत संपर्क साधला. खबरदारी घेतली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला आणि त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली.

येथील एअरपोर्टवरून इंधन भरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक एक चाक निखळून पडले. या घडामोडीपासून विमानाचे चालक दल अनभिज्ञ होते. मात्र, सीआयएसएफचे हवालदार रविकांत आवला यांनी तत्काळ आपले डेप्युटी कमांडंट रविकुमार यांना ही माहिती कळविली.

त्यानंतर ही माहिती वैमानिकाला देण्यात आली. मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टवर माहिती देऊन इमर्जन्सी लँडिंगची तयारी ठेवण्याची सूचना करण्यात आली. योग्य आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज विशद करून नागपूरची यंत्रणा तब्बल चार तास सलग मुंबई एअरपोर्टशी संपर्कात होती. त्याचमुळे वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. एक अत्यंत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सीआयएसएफचे जवान रविकांत यांनी दाखवलेली सतर्कता लक्षात घेऊन सीआयएसएफच्या महासंचालकांनी रविकांत यांना आज १० हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र जाहीर करून गौरविले. सीआयएसएफ महासंचालकांनी तशी घोषणा ट्विट करत केली. सैन्याच्या प्रमुखांनीदेखील रविकांत यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

या संबंधाने नागपूर एअरपोर्ट सीआयएसएफ युनिटचे डेप्युटी कमांडंट रविकुमार यांनीही रविकांत यांचे कौतुक करून आज त्यांचा यथोचित गौरव केला.

---

ही सतर्कता प्रेरणादायी

रविकांत यांच्या सतर्कतेमुळे विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर बचावले. त्यांची सतर्कता सुरक्षा यंत्रणेतील प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे, असे रविकुमार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

---

Web Title: Air ambulance accident averted by CISF personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.