तांत्रिक कारणाने एअर अरेबियाचे विमान नागपूर विमानतळावर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:09 AM2021-02-08T04:09:14+5:302021-02-08T04:09:14+5:30
नागपूर : शारजाहहून बांगलादेशच्या चटगाव येथे जाणारे ए-३२० जी ९५२३ हे एअर अरेबियाचे विमान तांत्रिक कारणाने आणीबाणीच्या स्थितीत रविवारी ...
नागपूर : शारजाहहून बांगलादेशच्या चटगाव येथे जाणारे ए-३२० जी ९५२३ हे एअर अरेबियाचे विमान तांत्रिक कारणाने आणीबाणीच्या स्थितीत रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. विमानात १२९ प्रवासी होते. सर्वांना रात्रभर विमानतळावर थांबावे लागले.
एअर अरेबियाचे विमान नियमित उड्डाणांतर्गत शारजाहहून चटगावला जात होते. विमान आकाशातून जात असताना वैमानिकाला विमानाच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. वैमानिकाने नागपूर विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर विमानाला सायंकाळी ५.१५ वाजता डायव्हर्ट करून आणीबाणीच्या स्थितीत विमानतळावर उतरविण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत थांबविण्यात आले. दुरुस्तीसाठी कंपनीच्या तंत्रज्ञाला बोलाविण्यात आले आहे. विमानाच्या दुरुस्तीसाठी हैदराबादचेही तंत्रज्ञ येण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच विमान येथून रवाना होणार आहे. या दरम्यान विमान कंपनीतर्फे प्रवाशांसाठी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली. विमानाच्या दुरुस्तीला वेळ लागल्यास प्रवाशांची थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहा तासांऐवजी १६ तासांचा झाला प्रवास
विमानाने १२.५२ वाजता शारजाहहून उड्डाण केले आणि सायंकाळी ७.०६ वाजता ते चटगावला पोहोचणार होते; पण तांत्रिक बिघाडामुळे त्याला नागपूर विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. त्यानंतर आज, सोमवारी सकाळी प्रवाशांना नेण्यासाठी दुसरे विमान येणार आहे. या प्रकारे प्रवाशांचा प्रवास सहा तासांऐवजी १६.३० तासांचा होणार आहे.