वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 08:08 PM2020-02-01T20:08:41+5:302020-02-01T20:12:22+5:30

आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत.

Air-conditioned room plans don't work in fact: Ansuya Uike | वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. महिला आयोगावर माझी नेमणूक झाली तेव्हा वास्तवाची जाण नसलेले लोक योजना तयार करत असत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, असा सवाल उपस्थित करतानाच छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी योजनाकारांनी ग्रासरुटवर जाऊन, वास्तवाची जाणीव करवून घेऊन योजना साकाराव्या असे आवाहन केले.


रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सहकार भारतीच्या द्वितीय महिला अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल उईके बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलपती शशी वंजारी, स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, सहकार भारतीच्या शताब्दी पांडे, रमेश वैद्य, उदय जोशी, संध्या कुळकर्णी, नीलिमा बावणे उपस्थित होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिला मेढे व सहकार भरतीच्या विजया भुसारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
वर्षानुवर्षे महिलांसाठीच्या योजना या एकसारख्याच बनत असत. महिलांना मदत म्हणून कुठवर शिलाई मशीनचेच वाटप करणार? याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना, या विचारप्रक्रियेत बदल घडविण्याचे आवाहन केले असता, त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आणि महिला जशा विचार करतात तशा योजना त्यांच्यासाठी अमलात आणण्याची सूचना आयोगाला केल्याचे उईके यांनी यावेळी सांगितले. त्यातूनच ‘आदिवासी सशक्त योजना’ सारखे उपक्रम सादर झाले आणि परिवर्तन घडायला लागले. सहकार भारतीने आदिवासी भागातही पोहोचावे आणि बस्तरसारख्या भागातील आदिवासी महिलांना या कामात जोडून घ्यावे. सहकार भारती ही संस्था भारतीय संस्कृतीची मूळभाषा बोलते. ते वास्तवातही उतरवण्याची किमया साधण्याचे आवाहन राज्यपाल अनसूया उईके यांनी यावेळी केले. संचालन रेवती शेंदुर्णीकर यांनी केले तर आभार नीलिमा बावणे यांनी मानले.

महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याची गरज - शांताक्का
महिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी समाजात काम करण्याची गरज आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार भारतीने काम करण्याची गरज आहे. स्त्री ही शक्तिस्वरुपा आहे आणि ती समाजात परिवर्तन घडवू शकते म्हणून महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याचे आवाहन शांताक्का यांनी यावेळी केले.

राज्यपालांनी घेतले स्मारकाचे दर्शन
उद्घाटनापूर्वी राज्यपाल अनसूया उईके यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. सहकार भारतीचे हे आयोजन महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे उईके यावेळी म्हणाल्या.

Web Title: Air-conditioned room plans don't work in fact: Ansuya Uike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.