सहज फिरायला जायचे म्हणून हवा ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:46+5:302021-05-08T04:07:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर ...

Air e-pass for easy walking | सहज फिरायला जायचे म्हणून हवा ई-पास

सहज फिरायला जायचे म्हणून हवा ई-पास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नाही. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येते. हा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक रोज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज करत असून, ५० टक्केपेक्षा जास्त अर्जदार हे अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखवत आहेत. तर, अनेक महाभागांना सहज फिरायला जायचे आहे म्हणून ई-पास हवा आहे.

नागपुरात दिनांक २५ एप्रिल ते ४ मे दरम्यान नागपूर शहरातील १३ हजार २७३ जणांनी ई-पास मिळण्यासाठी अर्ज केला. या अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे ६,२३७ जणांना हा पास जारी करण्यात आला तर ७,०३६ जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच मंजूर झालेल्या अर्जांमध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या १,६५९ एवढी आहे.

म्हणे सहज भेटीला जायचे आहे

आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अनेकजण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाईकाला सहज भेटायला जायचे आहे, असे कारण सांगून ई-पास मिळवण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच त्यांचे अर्ज फेटाळले जातात.

--

२४ तासात मिळतो ई-पास

पोलिसांच्या साईटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासात ई-पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. नागपुरात पाच परिमंडळ असून, त्या-त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस उपायुक्त कार्यालयातही या पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

---

ही कागदपत्रे आवश्यक

ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जदाराने मागवून घ्यावे. ते प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता तसेच आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकन दिले जाते. पोलीस उपायुक्त कार्यालयात त्या अर्जाची छाननी होते आणि अर्ज मंजूर किंवा नामंजूर केला जातो.

---

येथे करा ऑनलाईन अर्ज

ज्यांना ई-पास हवा असेल त्यांनी Covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.

Web Title: Air e-pass for easy walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.