Air Fest 2022 : शानदार...जबरदस्त...जिंदाबाद ! ‘एअर फेस्ट’ने जिंकली नागपुरकरांची मने
By योगेश पांडे | Published: November 19, 2022 02:36 PM2022-11-19T14:36:00+5:302022-11-19T14:37:25+5:30
मंत्रमुग्ध करणारा नागपूरचा थरारक 'एयर फेस्ट' : ‘सूर्यकिरण’च्या कवायतींचा थरार
नागपूर : ‘सूर्यकिरण’...नावातच तेज, वेग आणि चपळता... हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क विमानाचेच ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपुरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले. केवळ ‘सूर्यकिरण’च नव्हे तर ‘आकाशगंगा’ चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने साकारलेला तिरंगा, ‘सारंग टीम’च्या वैमानिकांच्या ‘हेलिकॉप्टर्स’च्या माध्यमातील चित्तथरारक कवायती आणि ‘एनसीसी’च्या ‘कॅडेट्स’ने ‘एअरोमॉडेलिंग’मधून दाखविलेली हवेतील युद्धाचे प्रात्यक्षिक. प्रत्येक क्षण हा नागपुरकरांसाठी एक वेगळा अनुभव देणारा होता. सर्वच उपस्थितांच्या तोंडून भारतीय वायुदलासाठी शब्द निघाले, ‘शानदार...जबरदस्त...जिंदाबाद’!
मेंटेनन्स कमांड’तर्फे १९ नोव्हेंबर रोजी ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले. यावेळी एअर फोर्स बॅन्डनेदेखील विविध ‘थीम सॉन्ग’ सादर केले. तर दुसरीकडे रायफलधारी जवानांच्या ‘ड्रील’ने ‘एअर शो’मध्ये रंगत आणली. कदमताल करता करता क्षणात जवान एकमेकांच्या ‘रायफली’ बदलत होते.
‘पॅराट्रूपर्स’च्या धैर्याला सलाम
सर्वात अगोदर ‘अॅव्ह्रो’ विमान ‘पास’ झाले. काहीच वेळात आकाशात काही ठिपके दिसायला लागले. 'आकाशगंगा’ ही स्काय डायव्हिंग करणारी भारतीय वायुसेनेची चमू आहे. यामध्ये चौदा सदस्यांचा समावेश आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सुमारे ८ हजार फूट उंचीवरुन या चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने जमिनीकडे झेप घेतली. सर्वांच्या डोक्याच्या वर ‘पॅरेशूट्स’चे ठिपके दिसायला लागले व त्यानंतर एकानंतर एक सर्व ‘पॅराट्रूपर्स’ अलगदपणे जमिनीवर आले. तीनच्या जोडीने आलेल्या चमूने तर अवकाशात तिरंगा सादर केला व अवघ्या काही फुटांवर ते एकमेकांपासून वेगळे झाले. सर्वांनी या धाडसी कौशल्याची वाहवा केली.
'सारंग’ चमूच्या साहसिक कवायती
भारतीय हवाई दलाच्या हवाई कसरती करणाºया सारंग हेलिकॉप्टर पथकाने तर ‘एअर शो’मध्ये आणखी थरार आणला. ‘सारंग’च्या दोन चमूमध्ये प्रत्येकी चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा यात समावेश होता. विशिष्ट प्रकारे डिझाइन केलेल्या पंख्यांमुळे ध्रुव हेलिकॉप्टरमधून विविध प्रकारच्या कसरती करणे शक्य होते तसेच लष्करी वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. एकमेकांच्या समोर येत ‘क्रॉस’ करणे, अलगदपणे हेलिकॉप्टरची दिशा बदलत त्याला लंबरेषेत वर घेऊन जाणे, हवेत ‘हार्ट शेप फॉर्मेशन’ करणे इत्यादी कसरती या चमूने केल्या. सुमारे २० मिनीट या कसरती सुरू होत्या