‘जिव्हाळा’ला हवाय आधार
By admin | Published: July 10, 2017 01:56 AM2017-07-10T01:56:45+5:302017-07-10T01:56:45+5:30
गरीब, वंचित, निराधार, अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिव्हाळा परिवार सेवारत आहे.
होतकरू वंचितांचा निवारा : रद्दी विक्रीतून चालतोय ६० मुलांचा उदरनिर्वाह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब, वंचित, निराधार, अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिव्हाळा परिवार सेवारत आहे. निव्वळ निवाराच नाही, जगण्याच्या जडणघडणीत लागणाऱ्या सर्व सोयी या मुलांना जिव्हाळा पुरवीत आहे. मुलांना प्रकाशपर्वाकडे घेऊन जाणाऱ्या या जिव्हाळ्याचा मुख्य स्रोत केवळ रद्दीची विक्री आहे. गेल्या पाच वर्षांपासून नागेश पाटील आणि त्यांचे सहकारी हे सेवाकार्य अव्याहतपणे करीत आहेत. आज जिव्हाळा ६० सदस्यांचा झाला आहे. त्यामुळे गरजाही वाढल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी दानशूरांकडून सायकलींच्या मदतीची अपेक्षा आहे.
वंजारीनगर येथे प्लॉट नं. ३८ मध्ये जिव्हाळा परिवाराचा निवारा आहे. येथे परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यात येत आहेत. विदर्भातील १० मुली आणि अरुणाचल प्रदेशातील ५० मुले-मुली जिव्हाळ्यात वास्तव्यास आहेत. पाचव्या वर्गापासून ते बारावीचे शिक्षण ते घेत आहेत. १४ मुली या नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. दोन मुली मेडिकलची तयारी करीत आहेत. जिव्हाळा चालतोय तो रद्दीच्या विक्रीतून; दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे समाजातील सहहृदयी लोकांना घरातील वृत्तपत्राची रद्दी देण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते. या रद्दी संकलनातून गोळा झालेल्या निधीतून या मुलांचा शैक्षणिक खर्च, त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि निवाऱ्यावर खर्च होतो. विशेष म्हणजे हे ६० मुलांचे कुटुंब जिथे राहते, ते घरसुद्धा किरायाचे आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबाची दोनवेळचे पोट रद्दीच्या संकलनातून भरत आहे. परंतु शाळेचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्च त्यांना काहीसा डोईजड होतो आहे. त्यासाठी जिव्हाळा परिवारातील अविनाश संगवई, मीना पाटील, विनया फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. तरीसुद्धा काही बाबतीत कमतरता भासत आहे.
या विद्यार्थ्यांना
हव्यात सायकली
हे मुले-मुली न्यू इंग्लिश हायस्कूल, दीनानाथ विद्यालय या शाळांमध्ये शिकत आहेत. या मुलांना शाळेत पायी जावे लागते. घरात कुटुंब मोठे असल्याने झोपायचीही गैरसोय होते. मुलांच्या या छोट्या-मोठ्या गरजांच्या पूर्ततेसाठी समाजाकडून मदतीचा आधार हवा आहे. या मुलामुलींसाठी २० सायकलीची गरज आहे. नवीन असायलाच पाहिजे अशातला भाग नाही; सोबतच १५ गाद्या व ब्लँकेटची गरज आहे. हे छोटेसे आवाहन जिव्हाळा परिवाराचे समाजाला आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. परिवाराचे सचिव नागेश पाटील यांच्या ९७६३१५५८८५ यांच्याशी आपण संपर्क करू शकता अथवा एचडीएफसी बँकेच्या मानेवाडा शाखेतील २४५१७६२०००००२५ या खात्यातही मदत देऊ शकता.