एअरफोर्सला १.६ कोटींचा गंडा

By admin | Published: January 2, 2015 12:50 AM2015-01-02T00:50:38+5:302015-01-02T00:50:38+5:30

बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच

Air Force gets 1.6 crores | एअरफोर्सला १.६ कोटींचा गंडा

एअरफोर्सला १.६ कोटींचा गंडा

Next

बनावट चेकने रक्कम केली वळती : पोलिसांनी गोठवली खाती
नागपूर : बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत ही रक्कम काढून घेणाऱ्या आरोपींची दोन खाती गोठवली. त्यामुळे १ कोटी ३८ लाखांची रोकड बचावली आहे.
वायुसेनेला जबरदस्त हादरा देणारी ही घटना ३१ डिसेंबरला उजेडात आली. कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगारासाठी नेहमीप्रमाणे महिन्याच्या अखेरीस प्रत्येक युनिटच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वायुसेनानगर शाखेत नेहमीप्रमाणे एअरफोर्स युनिटच्या खात्यात रक्कम जमा झाली.
अधिकाऱ्यांनी केली चौकशी
नागपूर : लेखा विभागातून ही रोकड काढण्यासाठी धनादेश पाठविण्यात आला. मात्र, ‘इनसफिशियन्ट बॅलेन्स’ असा शेरा मारून बँक अधिकाऱ्यांनी हा धनादेश परत पाठविला. त्यामुळे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ०३८२४३ क्रमांकाच्या धनादेशाद्वारे १४ लाख ५४ हजार ३०० रुपये आणि ०३८२४४ क्रमांकाच्या धनादेशामार्फत १ कोटी ८१ लाख ४७ हजार ८०० असे एकूण १ कोटी ९६ लाख ०२,१०० रुपये काढून घेण्यात आल्याचे उघड झाले. त्याची माहिती लेखा विभागातील अधिकाऱ्यांकडून स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांना देण्यात आली. या प्रकारामुळे वायुसेना विभागाला जबर हादरा बसला.
शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी दिवसभर विचारमंथन केल्यानंतर वायुसेनेचे सहायक सुरक्षा अधिकारी सुनील गोपालकृष्ण पल्लीथाली (वय ४८) यांनी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी वरिष्ठांना ही माहिती देऊन लगेच तपास सुरू केला.
(प्रतिनिधी)
नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळ
अतिसंवेदनशील वायुसेनेच्या गेटवरही बाहेरचा व्यक्ती उभा राहू शकत नाही तेथे लेखा विभागातील चेकची माहिती मिळवण्यापासून तो तयार करण्यापर्यंतचे काम कोण करू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडविणाऱ्या या प्रकरणात ‘घर का भेदी’ असावा, असा पोलिसांना संशय आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने ‘त्या’ बँकेत खाते उघडले आहे, त्यातील एकाचे आडनाव झा आहे. मात्र ते नाव बोगस असावे, असा कयास आहे.
चेकचे झाले स्कॅनिंग
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या बनावट चेकच्या माध्यमातून ही रक्कम वळती करण्यात आली ते चेक वायुसेनेच्या लेखाविभागातच आहे. त्याचे स्कॅनिंग करून बनावट चेक तयार करण्यात आले आणि रक्कम एका सरकारी मान्यताप्राप्त खासगी बँकेच्या गड्डीगोदाम (सदर) शाखेतील दोन वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यात आली.

Web Title: Air Force gets 1.6 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.