भांडेवाडीची हवा सिव्हील लाईनपेक्षा अडीच पट प्रदूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 04:09 PM2022-03-16T16:09:22+5:302022-03-16T16:14:32+5:30
भांडेवाडी परिसरातील हवा भारतीय मानकापेक्षा दुप्पट, तर जागतिक मानकापेक्षा ८ पट प्रदूषित आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डचा परिसर प्रचंड प्रदूषित आहे, ही बाब सर्वश्रूत आहे. मात्र, प्रदूषणाच्या नेमक्या पातळीबाबत एका संस्थेने केलेले निरीक्षण अतिशय धक्कादायक आहे. डम्पिंग यार्डचा परिसर आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये धुलीकणांचे प्रदूषण हे नागपूरच्या सिव्हील लाईन्सपेक्षा अडीच पट जास्त आहे. भीतीदायक म्हणजे या परिसरातील रहिवाशांना २४ तास घातक दूषित हवेत श्वास घ्यावा लागताे आहे.
‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) या संस्थेने ४ डिसेंबर ते ३१ जानेवारी या दाेन महिन्यात प्रत्यक्ष भांडेवाडी डम्पिंग यार्ड गेट आणि त्यापासून दीड किलाेमीटर दूर वैष्णाेदेवी ले-आऊट या वस्तीत उपकरणाद्वारे हवेचे गुणवत्ता निरीक्षण केले. निरीक्षणानुसार कचराघराच्या गेटजवळ पीएम - २.५चे प्रमाण १३२.६ मायक्राॅन / घनमीटर, तर वैष्णाेदेवी परिसरातील स्टेशनवर १०२.६० म्यु. / घनमीटर एवढे आढळून आले. या दान्ही स्टेशनची सरासरी ११५.६३ म्युग्रॅम / घनमीटर एवढी आहे. वैष्णाेदेवी ले-आऊट या निवासी वस्तीत ५८ दिवसांच्या निरीक्षणापैकी ५६ दिवस हवेची गुणवत्ता दूषित आढळून आली. या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शहरातील एकमेव वायु गुणवत्ता माॅनिटरिंग स्टेशन असलेल्या सिव्हील लाईन्समध्ये ४३.४८ म्युग्रॅम / घनमीटर धुलीकणांचे प्रमाण हाेते.
नाेंदविलेले प्रमुख निरीक्षण
- डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक प्रदूषण. धुलीकणांची घनता १८६ म्यु. / घनमीटर ते ३३३२ म्युग्रॅम / घनमीटरपर्यंत नाेंद. हे प्रमाण कित्येक पटीने घातक आहे.
- डम्पिंग यार्डच्या प्रवेशद्वाराजवळ पीएम - २.५ची सरासरी घनता १३२.०६ म्यु. / घनमीटर. कचराघरात काम करणारे व आसपास राहणारे लाेक ५१पैकी ५० दिवस घातक हवेचा श्वास घेतात.
- निवासी वस्तीत २४ तासांच्या निरीक्षणानुसार रात्री ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्वाधिक १६५ म्यु. / घनमीटर प्रमाण नाेंदविले. सकाळी ८ नंतर दुपारी ४ वाजेपर्यंत ते ६१ म्यु. / घनमीटरपर्यंत खाली आले.
- भांडेवाडीच्या स्टेशनवर मध्यरात्री सर्वाधिक ४७८ म्यु. / घनमीटर नाेंद. दुपारी ४ दरम्यान ते २४८ म्यु. / घनमीटर नाेंदविले. यानुसार ते दिवसभर मानकापेक्षा कितीतरी अधिक आहे.
- कचरा ज्वलनामुळे या प्रदूषणात तीव्र वाढ झाल्याचे दिसते. बहुधा रात्री ही प्रक्रिया हाेत असल्याने प्रदूषणाची पातळी वाढते.
- प्रदूषणावर ढगाळ वातावरणाचा फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.
- पावसाळ्यात हा कचरा कुजण्यामुळे प्रचंड दुर्गंधी वस्तीतील नागरिकांना सहन करावी लागते.
जागतिक मानकापेक्षा ८ पट प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार धुलीकणाची मर्यादा ६० म्यु. / घनमीटर असावी, तर जागतिक आराेग्य संघटनेच्या मानकानुसार ही मर्यादा १५ म्यु. / घनमीटर आहे. म्हणजे भांडेवाडी परिसरातील हवा भारतीय मानकापेक्षा दुप्पट, तर जागतिक मानकापेक्षा ८ पट प्रदूषित आहे.
धुलीकणांची घनता (पीएम २.५) ही डम्पिंग यार्डमधील कचरा ज्वलनाशी निगडित आहे. या भागात हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी माॅनिटरिंग स्टेशन नसल्याने आम्ही दाेन महिने हा प्रयाेग केला. वर्गीकरण व प्रक्रिया न करता मिश्र कचरा येथे टाकला जाताे. कुजलेल्या कचऱ्यामुळे विषारी वायू बाहेर पडताे. त्यामुळे आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
- लीना बुद्धे, संस्थापक, सीएफएसडी.