नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:54 AM2019-02-24T00:54:52+5:302019-02-24T00:55:49+5:30
एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.
विमानाचे संचालक बोईंग ७७७-२०० एलआरसह (लॉन्ग रेंज) करण्यात येणार आहे. विमानाने २४० दिवसांचे उड्डाण केल्यामुळे फेसचेक करणे अनिवार्य होते. एअर इंडियाच्या ताफ्यात या प्रकारची तीन विमाने आहेत. फेसचेक पाच दिवसांचे असते. या विमानाला एमआरओमध्ये दुरुस्तीनंतर पुन्हा अतिरिक्त उड्डाण म्हणून चालविण्यात येते.
एमआरओमध्ये दुसरे विमान मुंबईहून २४ फेब्रुवारीला फेसचेक नियमित तपासणीसाठी येणार आहे. त्यानंतर हेच विमान एआय-१६२८ सोमवार, २५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता नागपुरातून मुंबईला रवाना होईल. उड्डाण बोर्इंग ७७७-३०० ईआरसह (एक्सटेंडेड रेंज) होणार आहे. या विमानाचे उड्डाण २४० दिवस आणि दोन हजार तासांचे झाले आहे.
कमी अंतरानंतरही जास्त भाडे
नागपुरातील एमआरओमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाच्या अतिरिक्त उड्डाणाचे भाडे कमी अंतर असतानाही जास्त आकारण्यात येणार आहे. नागपूर ते मुंबईचे अंतर कमी आहे. त्यानंतरही ५२४० रुपये आणि दिल्ली-नागपूरचे भाडे ३०४९ रुपये आकारण्यात येणार आहे. जास्त बुकिंग असल्यामुळे कमी शुल्क आणि कमी बुकिंग असल्यामुळे जास्त शुल्क असल्याचे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.
सहा विमानांचे उशिरा लॅण्डिंग
देशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात येणाऱ्या विमानांना २० मिनिटे ते दोन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे नागपुरातून अन्य शहरात जाणाऱ्या या विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.
सकाळी इंडिगोचे बंगळुरू येथून नागपुरात सकाळी ७.४५ वाजता येणारे ६ई५०९ विमान १ तास १४ मिनिटे उशिरा अर्थात ८.५९ वाजता आले. जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर ९डब्ल्यू६८३ या विमानाला १९ मिनिटे उशीर झाला. तर इंडिगोचे ६ई४८२ मुंबई-नागपूर विमान सकाळी १० ऐवजी ३८ मिनिटे उशिरा १० वाजून ३८ मिनिटांनी पोहोचले. इंडिगो कंपनीचे ६ई९२६ कोलकाता-नागपूर विमान दुपारी २ वाजून ५० मिनिटांऐवजी २१ मिनिटे उशिरा ३.११ वाजता पोहोचले. तसेच इंडिगोचेच ६ ई४३६ इंदूर-नागपूर विमान तब्बल २ तास ४ मिनिटे उशिरा अर्थात सायंकाळी ७.५५ ऐवजी रात्री ९.५९ वाजता आले. याशिवाय एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान रात्री ८.३५ ऐवजी १ तास ४४ मिनिटे उशिरा अर्थात रात्री १०.१९ वाजता पोहोचले.
सहा विमाने नागपुरात उशिरा आल्यामुळे नागपुरातून अन्य शहरांमध्ये विमानांना उड्डाण भरण्यास उशीर झाला.