नागपूरच्या आकाशात घिरट्या घालणारे विमान एअर इंडियाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:02 PM2018-02-21T22:02:16+5:302018-02-21T22:12:14+5:30
बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष.
एअर इंडिया-७७७ या विमानाद्वारे नागपुरात वैमानिकांना सहाव्यांदा प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी १८ फेब्रुवारीला प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास पाच ते सहा प्रशिक्षणार्थी वैमानिक विमानात होते. ही एकप्रकारे वैमानिकांची परीक्षा होती. विमान धावपट्टीवर वारंवार उतरविणे आणि आकाशात उड्डाण भरण्याच्या प्रशिक्षणार्थींचे कसब यावर गुण देण्यात येणार आहे. यापूर्वी सर्व प्रशिक्षणार्थींना हैदराबाद येथील सिम्युलेटरवर प्रशिक्षण मिळाले आहे. प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव देण्यासाठी एअर इंडिंयाचे विमान नवी दिल्लीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ११ वाजता आले. या विमानाची प्रवासीसंख्या ३४२ एवढी आहे. बुधवारी विमानात कॅप्टन, प्रशिक्षणार्थी होते. प्रवासी नव्हते.
वैमानिकांची परीक्षाच!
एअर इंडिया-७७७ या विमानातून प्रशिणार्थी वैमानिकांना प्रशिक्षण दिले. यापूर्वी नागपुरात १८ फेब्रुवारीलाही प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण म्हणजे वैमानिकांची एकप्रकारे परीक्षाच असते. वैमानिक सर्व बाबतीत तरबेज झाल्यानंतर नियमित उड्डाणादरम्यान त्यांची सेवा घेतली जाते.
वसंत बरडे, वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक,
एअर इंडिया.
विमानतळाची नियमित सेवा
प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी कंपन्यांना मिहान इंडिया लि.तर्फे नागपूर विमानतळ उपलब्ध करून देते. मुंबई आणि दिल्ली येथे हवाई वाहतूक जास्त असते. त्यामुळे हवाई वाहतूक कमी असलेल्या नागपूर विमानतळाला प्राधान्य असते. एअर इंडियाचे विमान सकाळी ११ वाजता नागपुरात आले आणि सायंकाळी ५.३० वाजता नवी दिल्लीकडे रवाना झाले. प्रशिक्षण देताना काही क्षण विमान धावपट्टीवर उतरले आणि उड्डाण भरले. एअर इंडियाचे विमान नागपुरातील एमआरओमध्ये देखभाल-दुरुस्तीसाठी महिन्यातून एकदा येते.
विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक,
मिहान इंडिया लिमिटेड.