एअर इंडियाची नागपूर-दिल्ली नवीन ‘रेड आय’ फ्लाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:19 AM2019-09-09T11:19:13+5:302019-09-09T11:21:19+5:30
एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली दरम्यान ‘रेड-आय’ फ्लाईट सुरू करीत आहे. या विमान प्रवासाचा दर कमी राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली दरम्यान ‘रेड-आय’ फ्लाईट सुरू करीत आहे. या विमान प्रवासाचा दर कमी राहील. हे विमान नागपुरातून रात्री उडणार आहे. तर परतीचा प्रवासही दुसऱ्या दिवशी रात्री करणार आहे. सध्या एअर इंडियाची नागपूर-दिल्ली प्रवासी सेवा सुरूच आहे.
एअर इंडियाची नवीन ‘रेड-आय’ फ्लाईट एआय-६४१ ही २७ सप्टेंबरला रात्री ११.३० वाजता दिल्लीहून नागपूरसाठी उडेल. रात्री १२.४० ला ही फ्लाईट नागपुरात पोहचेल. त्यानंतर एआय-६४२ ही फ्लाईट रात्री २ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी उडेल. पहाटे ३.४० वाजता दिल्लीला पोहचेल. १८० प्रवासी क्षमतेचे हे विमान आहे. या विमान प्रवासाचे भाडे २००० रुपये राहणार आहे. व्यावसायिक, वकील, सरकारी कामकाजासाठी अवागमन करणाऱ्यांना हे विमान अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्यांना हॉटेलमध्ये थांबविण्यासाठी खर्च करावा लागणार नाही. दिल्लीत पोहचल्यानंतर आपले कामकाज करून रात्री ११.३० वाजताच्या याच विमानाने नागपुरात पोहचणे त्यांना शक्य होईल.
काय आहे ‘रेड-आय’
‘रेड आय’ म्हणजे लाल डोळे, रात्रीच्या प्रवासात झोप होत नसल्यामुळे प्रवाशांचे डोळे लाल होतात. हे विमान रात्रीला प्रवास करणार असल्यामुळे विमानाला ‘रेड-आय’ हे नाव देण्यात आले आहे. युरोपमध्ये मध्यरात्रीच्या विमानसेवेचे चांगलेच चलन आहे. रात्री प्रवाशी उड्डाणांना रणवे सहज क्लिअर मिळतो. त्यामुळे विमान ‘लेट’ होण्याची शक्यता फार कमी आहे.