अबब.. नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ३९ हजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:32 AM2023-05-23T11:32:49+5:302023-05-23T11:33:41+5:30
मनमानी दरामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ
नागपूर : विमानांच्या तिकीट दराच्या स्पर्धेत आता सर्वच कंपन्यांनी मनमानी सुरू केली आहे. एअर इंडियाचे मंगळवारी, २३ मे रोजी सकाळी ७:३० वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानात रिक्त असलेल्या ‘ए’ दर्जाच्या दोन जागेपैकी एकाचे तिकीट ३९ हजार रूपये आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तिकिटाचे हे दर एअर इंडियाच्या सिस्टिमवरही दर्शविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या मनमानी दरामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-६२८ विमान मंगळवारी सकाळी ७:३० वाजता नागपुरातून मुंबईला जाते. या विमानातील दोन वगळता सर्वच तिकिटा बुक होत्या. अत्यावश्यक कामासाठी मुंबई जाण्यासाठी एअर इंडियाच्या तिकिटाची विचारपूस केलेल्या एका प्रवाशाला ‘अ’ दर्जाच्या दोन तिकीट रिक्त असल्याचे समजले. चौकशी केली असता एका तिकिटाचे दर ३९ हजार रूपये आकारण्यात येत असल्याचे कळताच ते अचंबित झाले. एवढेच नव्हे तर या दराबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. नागपुरातून मुंबईला मंगळवारी जाणाऱ्या अन्य विमान कंपन्यांचे दर सोमवारी सिस्टिमवर ८ ते १० हजार रूपये दर्शविण्यात आले होते. यावरून विमान कंपन्यांच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
काही महिन्यांआधी सरकारचा उपक्रम असलेली एअर इंडियाची मालकी आता टाटा समूहाकडे गेली आहे. कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर असे पहिल्यांदा घडले आहे.