सावधान... अन्यथा दिल्लीप्रमाणे दूषित हाेईल नागपूरची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:00 AM2021-11-15T11:00:33+5:302021-11-15T11:13:29+5:30
नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते.
लोकमत एक्सक्लुसिव्ह
शाहनवाज आलम
नागपूर : शहरामध्ये हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ हाेत आहे. रस्त्यावर धावणारी जुनी वाहने व साेबत उद्याेग कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराने शहराची हवा प्रदूषित केली आहे. या कारणाने हवेच्या गुणवत्तेचा स्तर (एअर क्वाॅलिटी इंडेक्स-एक्यूआय) दरराेज दीडशे पार जात आहे.
रविवारी १५२ एक्यूआयची नाेंद झाली. दिवाळीनंतर प्रदूषणात आणखी भर झाली आहे. सध्या दिल्लीत प्रदूषणामुळे लाॅकडाऊन लागण्याची स्थिती आली आहे. नागपुरातही सतर्कता पाळली नाही तर दिल्लीप्रमाणे येथेही श्वास घेणे कठीण हाेईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते डब्ल्यूएचओनुसार वातावरणात पीएम-२.५चा स्तर २५ मायक्राेग्रॅम घनमीटर (एमजीसीएम) असे तर हवा स्वच्छ मानली जाईल. मात्र नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे. अन्यथा स्थिती भयावह हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सातत्याने हाेत आहे वाढ
नागपुरात वायुप्रदूषणात सातत्याने वाढ नाेंदविली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार शनिवारी हवेमध्ये पीएम-२.५चा स्तर ३६.०८ एमजीसीएम व पीएम-१० चा स्तर ९६.३ एमजीसीएम हाेता. दुसरीकडे एक्यूआय १२ नाेव्हेंबरला १३७, १३ नाेव्हेंबरला १५३ तर १४ नाेव्हेंबर राेजी १५२ एक्यूआयची नाेंद करण्यात आली.
महाराष्ट्रातील टाॅप-१० प्रदूषित शहरे (सर्व आकडे एमजीसीएममध्ये)
१. मुंबई : १०७
२. मुंबई उपनगर : ९१
३. रायगड : ५८
४. ठाणे : ५१
५. नागपूर : ४३
६. गोंदिया जिल्हा : ४३
७. भंडारा : ३९
८. नंदुरबार : ३७
९. वर्धा : ३७
१०. नांदेड : ३६
वाढू शकताे अनेक आजारांचा धाेका
पीएम-२.५ हवेत राहणारा अतिसूक्ष्म कण हाेय. त्याचा व्यास २.५ मायक्राेमीटरपेक्षा कमी असताे. हा स्तर अधिक वाढल्यास धुके वाढतात. समाेरचे दिसायलाही कठीण जाते. हे धूलिकण सूक्ष्म आकाराचे असल्याने श्वसनावाटे शरीरामध्ये जाऊन फुप्फुस, यकृतावर परिणाम करतात. यामुळे खाेकला, ताप आदी आजारांसह अस्थमा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धाेकाही वाढताे. पीएम-२.५ लहान मुले व ज्येष्ठांसाठी अधिक धाेकादायक आहे. यामुळे डाेळे, गळा व फुफ्फुसाचा त्रास वाढताे. दुसरीकडे पीएम-१०चा स्तर सरासरी १०० एमजीसीएम असायला हवा. यापेक्षा अधिक वाढल्यास धाेकादायक मानला जाताे.