चिंता करायला लावणारी बाब, प्रदूषणाने काेंडला नागपूरकरांचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:38 PM2023-01-02T13:38:15+5:302023-01-02T13:38:53+5:30

डिसेंबरमध्ये ३१ पैकी ३० दिवस इंडेक्स धाेक्याच्या स्तरावर

Air Quality of nagpur worsening day by day, residents affected by pollution | चिंता करायला लावणारी बाब, प्रदूषणाने काेंडला नागपूरकरांचा श्वास

चिंता करायला लावणारी बाब, प्रदूषणाने काेंडला नागपूरकरांचा श्वास

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : हिवाळा सुरू झाल्यापासून नागपूर शहराच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टाेबर व नाेव्हेंबरनंतर डिसेंबरही नागपूरसाठी सर्वाधिक प्रदूषणाचा महिना ठरला. महिन्याच्या ३१ दिवसांपैकी ३० दिवस प्रदूषण उच्च स्तरावर नाेंदविण्यात आले. केवळ एक दिवस स्थिती समाधानकारक हाेती. नागपूरकरांसाठी ही चिंता करायला लावणारी बाब आहे.

नागपुरातील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असून ते मुंबई, दिल्ली शहराच्या रांगेत जात आहे. तज्ज्ञांच्या मते नाेव्हेंबर व डिसेंबर हे महिने प्रदूषणाचे असतात. माेठ्या प्रमाणात हाेत असलेले बांधकाम, विकासकामे आणि वीज केंद्राच्या प्रदूषणाचा नागपूरला विळखा पडला आहे. यात धूलिकणांचा वाटा माेठा असून, पीएम-२.५ हे सर्वाधिक प्रदूषित घटकांपैकी एक आहे. हिवाळ्यात वातावरणात असलेल्या दवबिंदू धूलिकणांचे प्रदूषण पसरविण्यास कारणीभूत ठरतात. औद्योगिक प्रदूषणासोबत कचरा ज्वलन आणि शहरात वाढलेले वाहनांचे प्रमाण व त्यातून निधणारा धूर हेही प्रदूषणात भर घालत आहेत.

ऑक्टाेबर महिन्यात ३१ पैकी २८ दिवस आणि नाेव्हेंबर महिन्यात ३० पैकी २९ दिवस प्रदूषित राहिल्याची नाेंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. आता डिसेंबरमध्येही परिस्थिती त्यापेक्षा वाईट झाली. महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत वायू गुणवत्ता निर्देशांक ३०० एक्युआयच्या पार गेले हाेते, जे अतिप्रदूषणाच्या श्रेणीत येते. त्यानंतर इंडेक्स खाली आला खरा, पण स्तर १५० ते २५० एक्युआयच्या दरम्यानच राहिला. केवळ १८ डिसेंबर राेजी इंडेक्स ९५ वर हाेते, जे समाधानकारक म्हणता येईल. मात्र, इतर सर्व दिवस एक्युआय १०० च्या वरच राहिले. यानुसार एक दिवस समाधानकारक, १० दिवस साधारण प्रदूषण, १५ दिवस अतिशय प्रदूषित, तर १ ते ५ डिसेंबर हे ५ दिवस अत्याधिक प्रदूषणाच्या श्रेणीत हाेते.

गुणवत्ता निर्देशांकाचे मानक - आराेग्यावर परिणाम

०-५० चांगला - आरोग्यासाठी चांगले

५१-१०० समाधानकारक - आधीच श्वसनाच्या रुग्णांसाठी त्रासदायक

१०१-२०० प्रदूषित - दमा, श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यांसाठी धोकादायक

२०१-३०० अति प्रदूषित - सर्व नागरिकांसाठी धोकादायक असते

३०१-४०० धोकादायक - राहण्यास अयाेग्य

प्रदूषणाच्या स्रोतांच्या त्रुटी कमी केल्यास प्रदूषण कमी होऊ शकेल. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शहरासाठी शासनाकडून केवळ कृती आराखडे आखले गेले. प्रदूषणामुळे किती लोक ग्रस्त आहेत यावर शासकीय आकडेवारी नाही. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर किती परिणाम झाला हे सिद्ध करण्यासाठी आरोग्य सर्व्हे होणे आवश्यक आहे.            

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष- ग्रीन प्लॅनेट सोसायटी

Web Title: Air Quality of nagpur worsening day by day, residents affected by pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.