४३ वर्षांपूर्वीच्या वाचनालयाला हवाय आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:29+5:302021-08-18T04:12:29+5:30

विजय नागपुरे कळमेश्वर : सर्व प्रकारची छापील, तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. ...

Air support to the library of 43 years ago! | ४३ वर्षांपूर्वीच्या वाचनालयाला हवाय आधार!

४३ वर्षांपूर्वीच्या वाचनालयाला हवाय आधार!

googlenewsNext

विजय नागपुरे

कळमेश्वर : सर्व प्रकारची छापील, तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय, परंतु कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय मात्र हक्काची जागा व इमारतीसाठी मागील ४३ वर्षांपासून राजकीय व्यवस्थेसोबत भांडताना दिसत आहे. या वाचनालयासाठी प्रशस्त इमारतीची गरज निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी, १९७८ मध्ये मोहपा नगरीत स्थापन झालेले महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आज ४३ वर्षांचे झाले आहे. ५०१ पुस्तकांतील ज्ञान मनोरंजनाच्या व ५१ ज्ञानी रसिक वाचकांच्या संयोगातून या वाचनालयाचा उगम झाला. या वाचनालयात ७ दैनिके, २६ नियतकालिकांसह ९ हजार ७८४ पुस्तके असून, एकूण सभासद संख्या ३२० आहे, तसेच १६४ आजीवन सभासद असून, ५०च्या जवळपास वाचक रोज वाचनालयात येतात.

१९७९ मध्ये या वाचनालयास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक, मुंबई यांचेकडून ‘ड’ वर्गाची तर १९८१ मध्ये ‘क’ वर्गाची मान्यता मिळाली. १९८० ते २०१२ या तब्बल ३२ वर्षांच्या काळात वाचनालय ‘क’ श्रेणीमध्ये धडपडत असताना, वाचनालयाने २०१२ मध्ये ‘ब’ श्रेणीमध्ये स्थान मिळविले.

मोहपा येथील गळबर्डी परिसरातून सुरू झालेले हे वाचनालय स्वतःची इमारत नसल्याने, आतापर्यंत १० वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले, तर सध्या पाण्याच्या टाकी परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी १९६६ला बांधण्यात आलेल्या निवासस्थानात २०१५ पासून सुरू आहे, परंतु या इमारतीला ५५ वर्षांचा कालावधी होत असून, ही इमारत जीर्ण झाली आहे.

वाचनालयाचा व्याप बघता, या इमारतीतील जागा विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी, तसेच वाचकांना बसण्यासाठी अपुरी पडत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेचा सराव करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे, तसेच शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याचे चित्र आहे.

वाचनालयाने ‘अ’ वर्ग श्रेणी प्राप्त करण्यासाठी लागणारे सर्व निकष पूर्ण केले आहेत, परंतु स्वतःच्या स्वतंत्र इमारतीची पूर्तता करण्यास सध्या तरी असमर्थ ठरली आहे.

असे आहेत वाचनालयाचे निकष

वाचनालयाच्या निकषानुसार, महिला वाचन कक्ष, बालवाचन कक्ष, सामान्य वाचन कक्ष वेगवेगळे असणे आवश्यक आहे, परंतु जागेअभावी या निकषांची परिपूर्तता होऊ शकत नाही. म्हणून नगरपरिषदेने वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून, देण्याची गत २० वर्षांपासून सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत जागा मिळाली नसल्याची खंत वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबक राऊत, उपाध्यक्ष नंदकिशोर आखरे, सचिव ॲड.हर्षल यावलकर, सहसचिव सेवाराम नेरकर, कोषाध्यक्ष विजय वानखेडे, सभासद प्रशांत महाजन, वैशाली ढगे, प्रदीप विघ्ने, गजेंद्र बांबल यांनी व्यक्त केली.

समृद्ध ग्रंथसंपदा

१९७८ साली स्थापन झालेल्या या वाचनालयात त्या काळातील इंग्रजी पुस्तकांचा संग्रह, आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ, याचबरोबर सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, स्पर्धा परीक्षा, रोजगार नोकरी अशा अनेकविध विषयांवरील ग्रंथसंपदा, जना-मनात विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या लोकप्रिय साहित्यिकांचे वाचनसाहित्य यांनी समृद्ध असे हे वाचनालय आहे. आज रोजी वाचनालयाची ग्रंथ संपदा सुमारे ९,७८४ असून, ती ५०,००० करण्याचा वाचनालयाचा मानस आहे.

-

४३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या वाचनालयाची प्रगतिपथाकडे वाटचाल सुरू असून, तरुणांना वाचन संस्कृतीकडे वळवायचे असेल, तर वाचनालय इमारतीची स्वतंत्र विस्तारित वास्तू असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी २४ तास वाचन कक्ष असावा, असा आमचा मानस आहे.

त्र्यंबक राऊत, अध्यक्ष, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, मोहपा.

Web Title: Air support to the library of 43 years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.