नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 10:18 PM2022-10-28T22:18:51+5:302022-10-28T22:20:53+5:30

Nagpur News वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींच्या या प्रकल्पावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे.

Airbus Tata to Maharashtra due to lack of consensus among leaders | नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात होणाऱ्या २२ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी नेत्यांमध्येच समन्वयाचा अभावभुजबळांचा नाशिकवर तर फडणवीस-गडकरींचा नागपूरवर भर, सामंत यांनी तर घोषणाही केली होती

 

कमल शर्मा

नागपूर : वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकल्प आपापल्या शहरात व्हावा यावर नेत्यांकडून अधिक भर दिला जात असल्यानेच एअरबस प्रकल्पाने महाराष्ट्राला टाटा केल्याचे सर्वात मोठे कारण ठरल्याचे मानले जात आहे.

या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु आता महाराष्ट्रात नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष व गुजरातमध्ये वडोदरासाठी एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणूक करण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’कडे भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत आहे. या पत्रात त्यांनी राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री या नात्याने टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे अगोदरच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी तर मागच्या महिन्यातच टाटा एयअरबससंदर्भात दिल्लीत जाऊन चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून टाटा समूहाला मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. त्यांनी यात एअरबसचा उल्लेख केला नव्हता; परंतु टाटाच्या सर्व कंपन्यांचा उल्लेख मात्र केला हाता. याचदरम्यान एकनाथ शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर हा प्रकल्प मिहानमध्ये येत असल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते. आता नेत्यांचा असा तर्क आहे की, आपापल्या क्षेत्राची चिंता करणे यात काहीही चुकीचे नाही.

तर विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसाय विकसित झाला असता

वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. एअरबस प्रकल्प नागपुरात आला असता तर त्याला प्रोत्साहन मिळाले असते. विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसायही विकसित झाला असता. आता विदर्भात कुठल्याही परिस्थितीत रिफायनरीसह पेट्रोकेमिकल प्रकल्प यायला हवा.

एअरबस प्रकल्पावर एक दृष्टिक्षेप

- वायुसेनेसाठी टाटा एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करणे

- वायुसेनेसाठी विमान बनवणारा पहिला खासगी प्रकल्प

- नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती.

- आता गुजरातच्या वडोदरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑक्टोबर रोजी याचे भूमिपूजन करतील.

- सी-२९५ विमानाची क्षमता ५ ते १० टन आहे.

-३००० नोकऱ्या निर्माण होणार, ६०० तज्ज्ञांचा सहभाग

Web Title: Airbus Tata to Maharashtra due to lack of consensus among leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा