विमान दुरुस्तीचे धडे मिळणार नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 08:46 PM2019-09-21T20:46:13+5:302019-09-21T20:49:56+5:30
विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे. ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेंट फीटर’असे अभ्यासक्रमाचे नाव आहे. या माध्यमातून देशात पहिल्यांदा विमानाच्या दुरुस्तीच्या अभ्यासक्रमाचा मान नागपूरला मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हीएशन कंपनीशी यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. तीन वर्षांसाठी या अभ्यासक्रमाची जबाबदारी दसॉल्ट कंपनीने घेतली आहे. विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. भारतीय वायुसेनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी दसॉल्ट एव्हीएशन ही कंपनी साहित्याच्या डिझाईनपासून ते उत्पादन आणि त्याची देखभाल करते. या कंपनीने प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रम विकसित करण्यासाठी दसॉल्ट स्कील अकादमीची स्थापना केली आहे. या अकादमीच्या माध्यमातूनच नागपूर आयटीआयमध्ये प्रशिक्षणासाठी संपूर्ण यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तीन वर्ष दसॉल्ट अकादमीच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे नागपूरच्या विद्यार्थ्यांना जागतिकस्तराचे प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची संधी आहे. आयटीआयमध्ये २०१९-२० या सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासंदर्भात एसएमएस पाठविण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी आयटीआयच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबर रोजी समुपदेशन फेरीद्वारे उमेदवाराचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे.
आयटीआयने केली तयारी
दसॉल्ट अकादमीने वर्कशॉपसाठी ले-आऊट दिले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीसाठी पत्र दिले आहे. तीन वर्ष दसॉल्ट प्रशिक्षणाची संपूर्ण मशीनरी पुरविणार आहे. नागपूर आयटीआयला या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या नियुक्तीची मान्यता मिळाली आहे. यावर्षी २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी दोन बॅचमध्ये अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण होणार आहे.
जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण
विमान उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. भारतात पहिल्यांदाच विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूर आयटीआयमध्ये सुरू होणार आहे. जागतिक दर्जाचे हे प्रशिक्षण राहणार असून, नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
हेमंत आवारे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर