सणांच्या दिवसातही विमान कंपन्यांची नवी उड्डाणे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 10:47 AM2020-11-07T10:47:19+5:302020-11-07T10:49:17+5:30
Nagpur News flight सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही.
श्रेयस होले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी सण जवळ येत असतानाच बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना लॉकडाऊननंतर हवाई क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या अनेक व्यावसायिक शहरात परत येत आहेत, त्यानंतरही सणांच्या दिवसात हवाई क्षेत्रात फारसा उत्साह नाही. प्रवासी वाढल्यास उड्डाणे पूर्वीप्रमाणेच सामान्य होतील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रूही म्हणाले, सध्या नागपूर विमानतळावरून दररोज १३ ते १७ विमाने उड्डाण घेत आहेत. कोरोना लॉकडाऊनपूर्वी ही संख्या ३१ ते ३४ होती. सणांच्या दिवसात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन पूर्वीप्रमाणेच विमानतळावरून उड्डाणांच्या संख्येत वाढ होऊन उड्डाणे सामान्य होतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. इतकेच नव्हे तर प्रवासी संख्या कमी असल्याने नियोजित उड्डाणेदेखील रद्द केली जात आहेत. परिणामी विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.
रूही म्हणाले, हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील काही मुख्य सण आणि उत्सवांमुळे विमान कंपन्या नागपुरात व जाण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यासाठी सहसा अर्ज करतात. परंतु यावर्षी कोणत्याही विमान कंपनीने जादा उड्डाणांची मागणी केली नाही. विमानतळाच्या वाढीव उड्डाणांव्यतिरिक्त विमानतळ हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मान्यवरांची चार्टर्ड उड्डाणेदेखील हाताळते. त्यामुळे विमानतळाला अतिरिक्त महसूल मिळते. परंतु, यावर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता असल्याने विमानतळाच्या उत्पन्नात आणखी एक मोठे नुकसान होणार आहे.
उल्लेखनीय असे की, दररोजच्या विमानांची संख्या जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला यंदा ५० कोटींचा नफा झाला आहे.
विमानतळावर प्रवासी सुरक्षित राहावेत म्हणून विमानतळ व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. विमानतळवर सर्व आवश्यक कोरोना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी सुरक्षित हवाई प्रवास करावा, यासाठी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे रूही यांनी सांगितले.