विमान कंपन्यांनी रद्द झालेल्या विमानाचा परतावा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:41 AM2020-07-04T00:41:13+5:302020-07-04T00:42:43+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्राकडे येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्राकडे येत आहेत.
आयुष्याची पुंजी एकत्र करून परदेशवारी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक प्रवासी ग्राहकांचे स्वप्न भंग पावले असून, यात विमान कंपन्यांच्या पैसे परत न करण्याच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक प्रवासी ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. विमान कंपन्यांनी प्रवासी ग्राहकांना एक वर्षाची मुदत देऊन नंतर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. सगळ्यांनाच हे शक्य असेल असे नाही. अशी सवलत देतानादेखील विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या हिताला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आकर्षक अशा स्वरूपाचे पॅकेज आणि ज्या ग्राहकांना ही सवलत घ्यायची नसेल त्यांना परतावा देणे आवश्यक आहे.
ग्राहकाने स्वत:हून विमानाचे तिकीट रद्द केले तर विमान कंपन्या कॅन्सलेशनच्या नियमानुसार पैसे घेऊन बाकीची रक्कम परत करतात. परंतु जर विमान कॅन्सल झाले किंवा लेट झाले तर त्याचे पूर्ण पैसे विमान कंपन्या देत असतात. या पार्श्वभूमीवर जागतिक महामारीच्या काळात सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांचा माणुसकीच्या भावनेतून आदर करून प्रवासी ग्राहकांना त्यांच्या बुकिंगचे पैसे परत करावेत, अशा प्रकारची भूमिका ग्राहक पंचायत महाराष्ट्रने मांडली आहे.
यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील जगातील सर्व देशांना याबाबत सूचना दिल्या आहेत. देशातील विमान कंपन्यांनी प्रवाशांना बुकिंग केलेले पैसे विनाअट परत करण्याबाबत भारत सरकारने सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, विदर्भचे अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी प्रधानमंत्री, हवाई वाहतूक मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्री यांनी निवेदनाद्वारे केली आहे.