नागपुरात विमाने जागेवर उभी,दरदिवशी सरासरी ३० लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:57 PM2020-03-24T23:57:50+5:302020-03-24T23:59:40+5:30
दररोज येणाऱ्याआणि जाणाऱ्या ५० उड्डाणांमुळे विमानतळाला दरदिवशी जवळपास ३० लाख रुपये आणि दरमहा ९ कोटी रुपयांचे उत्पन्न होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवार मध्यरात्रीपासून घरगुती विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळावर शांतता आहे. विभिन्न शहरांना नागपूरशी जोडणाऱ्या वाहतुकीच्या या साधनांवर आता विराम लागला आहे. त्यामुळे उपराजधानी पूर्णत: लॉकडाऊन झाली आहे.
नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई या शहरांसाठी विमानसेवा आहेत. याशिवाय दोहा व शारजाहकरिता दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. दररोज येणाऱ्याआणि जाणाऱ्या ५० उड्डाणांमुळे विमानतळाला दरदिवशी जवळपास ३० लाख रुपये आणि दरमहा ९ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. विमान सेवा केव्हा बहाल होईल, यावर स्थिती अजूनही स्पष्ट नाही. पण उपराजधानीत कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बस आणि विमानसेवा बंद असल्याने आता नागपूरने स्वत:ला वेगळे केले आहे. ही बाब नागपूरकरांच्या जागरूकतेमुळे शक्य झाली आहे.
चार विमाने विमानतळावर उभी राहणार
विमानतळावर गो एअरची दोन आणि इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने नाईट पार्किंगला असतात. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दोन कंपन्यांची एकूण चार विमाने नागपुरात पोहोचली, पण बंदीमुळे नागपुरातच थांबली.
सर्व मार्गांवर तपासणी
विमानतळासाठी विजयनगर आणि वर्धा रोडशी जुळलेल्या दोन मार्गांवर सीआयएसएफ आणि पोलिसांचे लक्ष आहे. दोन्ही मार्गांवरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर तपासणी करण्यात येत आहे. पण उड्डाणे बंद झाल्यानंतर या मार्गावरून जाणारी वाहने जवळपास बंद झाली आहेत.
केवळ संचालनाशी संबंधित कर्मचारी राहणार
सर्व उड्डाणे थांबल्यानंतरही विमानतळावर संचालन शाखेशी जुळलेले कर्मचारी मर्यादित संख्येत तैनात राहतील. कारण कोणतेही सरकारी विमान आणि भारतीय वायुसेनेच्या विमानाची ये-जा केव्हाही होऊ शकते. याशिवाय कोणत्याही वैद्यकीय सेवेसाठी विमानतळाला नेहमीच सज्ज राहावे लागते. उड्डाणांचे संचालन होत नसल्याने विमानतळाला तोटा सहन करावा लागत आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही पालन करीत आहोत.
मो. आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.