विमानतळ रामभरोसे !
By admin | Published: January 7, 2016 03:30 AM2016-01-07T03:30:14+5:302016-01-07T03:30:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत अनेक दावे करण्यात आले.
दर्जा आंतरराष्ट्रीय; सुविधा लोकल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुरक्षेचे तीन तेरा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत अनेक दावे करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात विमानतळावर अनेक असुविधा असून अनेक भागात सुरक्षा भिंत बिनकामाची ठरत आहे. विमानतळाची सुरक्षा रामभरोसे आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
विमानतळाचे हस्तांतरण होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु तरीसुद्धा विमानतळाच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यासाठी आतापर्यंत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. आॅपरेशनल एरियानंतरच्या भिंतीखाली छिद्रे पडली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डुकरांनी या भिंतीखाली खोदून खड्डे तयार केले आहेत. हे खड्डे एवढे मोठे झाले आहेत की यातून गाय सहज आत येऊ शकते. दोन भिंतीच्या मधील हा भाग जनावरांना चरण्यासाठी कुरण झाला आहे. सोनेगावला लागूून आॅपरेशनल सुरक्षा भिंतीचा एक भाग अजूनपर्यंत तिरपा असून त्याखाली खड्डे आहेत. यालाच लागून वॉच टॉवरही आहे. डुकरांनी घुसखोरी करण्यासाठी तयार केलेले हे रस्ते घातक ठरू शकतात. आजूबाजूच्या काही गावकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विमानतळ व्यवस्थापनाला या बाबीकडे गंभीरतेने पाहून कार्य केल्यास त्यांना विमानतळावरील त्रुटींची माहिती मिळेल. (प्रतिनिधी)
ही कशाची पाहणी
१४ सप्टेंबर २०१५ रोजी राष्ट्रपतींच्या विमानासमोर डुकरांचा कळप आला होता. त्यानंतर डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमूने विमानतळाची पाहणी करून मुख्यालयाला अहवाल पाठविला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर एक हरीण विमानतळावर पकडण्यात आले. विमानतळावरील त्रुटी दूर केल्यानंतरही जनावरांची घुसखोरी कशी होत आहे, हा प्रश्न आहे.
फ्लार्इंग क्लबसमोर कचरा
विमानतळ परिसरात नागपूर फ्लार्इंग क्लबसमोरील सुरक्षा भिंतीशेजारी कचरा गोळा झाला आहे. या सुरक्षा भिंतीला ये-जा करण्यासाठी तोडण्यात आले आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर या भिंतीला लोखंडी गेट लावण्यात आले. त्यानंतर पुन्हा या भिंतीचा भाग तोडण्यात आला आहे. विमानतळावरील काही कर्मचारी येथूनच ये-जा करतात.