विमानतळाचा महसूल कमी, आर्थिक स्थिती मात्र भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:43+5:302021-01-08T04:17:43+5:30
मार्चपासून महसूल वाढण्याची शक्यता श्रेयस होले नागपूर : विमान क्षेत्राने कोविड लॉकडाऊनदरम्यान साधारण २५ हजार कोटीचे नुकसान सहन केले. ...
मार्चपासून महसूल वाढण्याची शक्यता
श्रेयस होले
नागपूर : विमान क्षेत्राने कोविड लॉकडाऊनदरम्यान साधारण २५ हजार कोटीचे नुकसान सहन केले. मात्र मार्चनंतर हे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरदेखील विमान क्षेत्राचे नुकसान सुरूच होते. याचे मुख्य कारण म्हणजे कमी झालेली उड्डाणे व प्रवासीसंख्या आहे. याचा परिणाम नागपुरातून संचालित होणाऱ्या उड्डाणावरदेखील झाला आहे. सद्यस्थितीत नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॉकडाऊन आधीच्या तुलनेत केवळ ३० ते ३५ टक्के उड्डाणे संचालित होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील उड्डाणांची संख्या व प्रवासीसंख्या फारशी वाढलेली नाही. असे असतानादेखील विमानतळाला तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करणे भाग आहे. विमानतळावर सध्या एक हजारापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी कंत्राटी असले तरीही विमानतळाच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. ‘लोकमत’शी बोलताना विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रुही यांनी सांगितले की, विमानतळाच्या महसुलात घट झाली असली तरी कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांना वेळेवर देण्यात येत आहे. विमानतळाची आर्थिक स्थिती सध्या भक्कम आहे. विमानन क्षेत्र आतुरतेने कोरोना लसीची वाट पाहत आहे. सध्या प्रवासी कोरोनाच्या भितीमुळे विमान प्रवास टाळत आहेत. परंतु लस आल्यानंतर प्रवाशांना सुरक्षितता वाटून ते विमान प्रवासाकडे वळतील. मार्चनंतर विमानांचे शेड्युल बदलणार आहे. काही नवीन उड्डाणेदेखील सुरू होतील. साधारणपणे त्याच वेळी कोरोनाची लसदेखील लोकांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास विमान प्रवाशांची संख्या वाढेल, असा विश्वास रुही यांनी व्यक्त केला.
.........