गणेशपेठ स्थानकावर कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:54+5:302021-03-27T04:07:54+5:30

नागपूर : शनिवार, रविवार आणि सोमवारी लागोपाठ सुट्या आल्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दी केली. कोरोनाच्या नियमांची ...

Aishitashi of corona rules at Ganeshpeth station () | गणेशपेठ स्थानकावर कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी ()

गणेशपेठ स्थानकावर कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी ()

googlenewsNext

नागपूर : शनिवार, रविवार आणि सोमवारी लागोपाठ सुट्या आल्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दी केली. कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी करीत एका बसमध्ये ५० प्रवासी चढले. वाहकाने प्रवाशांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे कोरोनाची लाट ओसरली की काय़, असा प्रश्न पडला.

शनिवारी बहुतांश शासकीय कार्यालयांना सुटी असते. रविवारी होळी आणि सोमवारी धूलिवंदन असल्यामुळे लागोपाठ तिन दिवस सुट्या आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कर्मचारी आणि मजुरांनी होळीसाठी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेनंतर बसस्थानकावर गर्दी करणे सुरु केले. यात गोंदिया मार्गावरील बहुतांश प्रवाशांचा समावेश होता. लॉकडाऊनमुळे एसटी बसेस ५० टक्के क्षमतेने चालविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार एका बसमध्ये २२ प्रवासी आणि एका सीटवर एक प्रवासी बसणे अपेक्षित होते. परंतु दुपारी ४ वाजतानंतर गोंदियाची बस लागल्यानंतर प्रवासी बसवर तुटून पडले. अनेक प्रवासी बसचे दार उघडताच आत जाण्यासाठी एकमेकांना दूर सारून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते. काही मिनिटातच एका बसमध्ये ५० प्रवासी चढले. बसची क्षमता केवळ २२ प्रवाशांची आहे, अशी सूचना वाहकाने प्रवाशांना केली. परंतु कुणीच ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र निर्माण झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना प्रवाशांनी कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी केल्यामुळे आश्चर्य वाटले. याबाबत विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

.............

गोंदिया, साकोली, देवरी मार्गावरील बस फुल्ल

होळीमुळे अनेक मजुरांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा बेत आखला. यात गोंदिया, साकोली, देवरी, गडचिरोली, अहेरी येथे जाणाऱ्या बहुतांश मजुरांचा आणि शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गोंदियाच्या पहिल्या बसमध्ये ५० प्रवासी चढल्यानंतर काही वेळातच गोंदिया मार्गावर जाणारी दुसरी बस लागली. ही बसही अशीच फुल्ल होऊन या बसमध्येही ५० च्या जवळपास प्रवासी चढले.

खिडकीतून टाकल्या बॅग

बस लागल्यानंतर वाहकाने दरवाजा उघडताच अनेक प्रवाशांनी बसच्या दारावर गर्दी केली. गर्दीमुळे बसमध्ये चढणे शक्य नसल्याचे पाहून अनेकांनी खिडकीचा पर्याय शोधला. बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी खिडकीतून बॅग टाकून अनेकांनी बसच्या खिडकीतून सीटवर बॅग ठेवून आपल्या बसण्याची व्यवस्था केली.

.............

Web Title: Aishitashi of corona rules at Ganeshpeth station ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.